सध्या भारतात इंडियन प्रीमियर लीगच्या १५व्या हंगामाचा थरार चालू आहे. या स्पर्धेत जगभरातील सर्वोत्तम खेळाडू आपल्या संघाला आयपीएल २०२२ चे जेतेपद मिळवून देण्यासाठी प्रचंड मेहनत घेत आहेत.
‘इंडिया का त्योहार’ म्हटल्या जाणाऱ्या आयपीएलची आजच्याच दिवशी १४ वर्षांपूर्वी सुरुवात झाली होती. जगातील सर्वात मोठी क्रिकेट लीग मानल्या जाणाऱ्या आयपीएल स्पर्धेचा प्रारंभ २००८ मध्ये झाला होता. या सामन्यातील पहिल्याच डावात ब्रेंडन मॅक्युलमने तुफानी शतक झळकावत १५८ धावांची खेळी केली होती. गेल्या १३ हंगामात या स्पर्धेत अनेक विक्रम, चौकार-षटकारांची आतषबाजी, वाद विवाद असे अविस्मरणीय प्रसंग घडले आहेत. मुख्य म्हणजे या स्पर्धेने आंतरराष्ट्रीय संघांना प्रतिभाशाली युवा खेळाडू देण्यात महत्वाची भूमिका बजावली आहे.
आयपीएलच्या पहिल्या हंगामात एमएस धोनी हा सर्वात महागडा खेळाडू ठरला होता. धोनीला चेन्नई सुपर किंग्ज संघाने ६ कोटी खर्च करत आपल्या संघात स्थान दिले होते. तो अजुनपर्यंत चेन्नई सुपर किंग्ज संघाचा कर्णधार आहे.
कोलकाता आणि बेंगलोर यांच्यात रंगली होती पहिली लढत
आयपीएलचा पहिला सामना कोलकाता नाईट रायडर्स आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघामध्ये खेळवला गेला होता. या सामन्यात ब्रेंडन मॅक्युलम आणि कोलकाताचा तत्कालिन कर्णधार सौरव गांगुलीने प्रथम फलंदाजीला येऊन चौकार आणि षटकारांचा पाऊस पाडला होता.
ब्रेंडन मॅक्युलमची तुफान फटकेबाजी
या स्पर्धेतील पहिला चौकार ब्रेंडन मॅक्युलमने जहीर खानच्या चेंडूवर लगावला होता. त्यानंतर जे काही झालं ते तुम्हाला चांगलच माहीत असेल. ब्रेंडन मॅक्युलमने ३२ चेंडूमध्ये ५ चौकार आणि ३ षटकार मारत नाबाद अर्धशतक झळकावले होते. त्यानंतर त्याने डावाखेर नाबाद राहत ५३ चेंडूत ८ चौकार आणि ७ षटकार लगावत आयपीएल इतिहासातील पहिले शतक नोंदवले होते.
तसेच शतक केल्यानंतर त्याची फलंदाजी आणखी आक्रमक झाली होती. डावाच्या शेवटी मॅक्युलम ७३ चेंडूत १३ षटकार आणि १० चौकारांसह तब्बल १५८ धावा करत नाबाद राहिला होता.
रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाला करावा लागला पराभवाचा सामना
ब्रेंडन मॅक्युलमच्या तुफान फटकेबाजीमुळे कोलकाता संघाने २० षटकअखेर २२२ धावांचा डोंगर उभारला होता. प्रत्युत्तरात राहुल द्रविडच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाला १०० धावा देखील करता आल्या नव्हत्या. बंगलोर संघ १५.१ षटकात सर्वबाद ८२ धावाच करू शकला होता. बेंगलोर संघाकडून प्रवीण कुमारने सर्वाधिक नाबाद १८ धावा केल्या होत्या. याच बेंगलोर संघाला, आयपीएलचे १३ हंगाम होऊनही आतापर्यंत एकदाही जेतेपद पटकावण्यास यश आलेले नाही.
आयपीएलच्या १४ हंगामात जेतेपद पटकावणारे संघ
२००८ – राजस्थान रॉयल्स
२००९ – डेक्कन चार्जर्स
२०१० – चेन्नई सुपर किंग्ज
२०११- चेन्नई सुपर किंग्ज
२०१२ -कोलकाता नाईट रायडर्स
२०१३- मुंबई इंडियन्स
२०१४ – कोलकाता नाईट रायडर्स
२०१५ – मुंबई इंडियन्स
२०१६. – सनरायझर्स हैदराबाद
२०१७ – मुंबई इंडियन्स
२०१८ – चेन्नई सुपर किंग्ज
२०१९ – मुंबई इंडियन्स
२०२० – मुंबई इंडियन्स
२०२१- चेन्नई सुपर किंग्ज
महत्त्वाच्या बातम्या-
झेल पकडणं सोडा, साधे प्रयत्नही नाही केले! गुजरातच्या मॅच विनरचा कॅच सोडणाऱ्या दुबेवर भडकला जडेजा
थक गये है..! गुजरातविरुद्ध पराभूत झालेल्या सीएसकेवर नेटकऱ्यांनी साधला निशाणा, मीम्स व्हायरल
सामना गमावला, पण चेन्नईच्या कर्णधारानं केला खास कारनामा; रोहित अन् पंड्यालाही टाकलंय मागं