क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ आहे असे म्हटले जाते. या खेळात कधी काय होईल याचा काहीच नेम नसतो. अनेकदा असे ही पाहायला मिळाले आहे, जिथे कमकुवत संघाने बलाढ्य संघांना पराभूत करत इतिहास रचला आहे. तसेच सर्वांना माहीतच आहे ऑस्ट्रेलियन संघाने २०००-२०१० च्या दशकात आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आपला दबदबा निर्माण केला होता. ऑस्ट्रेलियन संघाला पराभूत करणे काही सोपी गोष्ट नव्हती. परंतु असा कारनामा झिम्बाब्वे संघाने केला होता.
ऑस्ट्रेलिया सारख्या बलाढ्य संघाला झिम्बाब्वे संघाने पराभूत करत इतिहासाला गवसणी घातली होती. ते ही द्विपक्षीय मालिकेत नव्हे तर चक्क विश्वचषक स्पर्धेत. झिम्बाब्वे संघाने हा कारनामा १९८३ विश्वचषक स्पर्धेत केला होता. या सामन्यात झिम्बाब्वे संघाने ऑस्ट्रेलियन संघाला १३ धावांनी पराभूत केले होते.
आजच्या दिवशी ३९ वर्षांपूर्वी म्हणजेच ९ जून १९८३ मध्ये झिम्बाब्वे आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात विश्वचषक स्पर्धेचा सामना खेळाला गेला होता. नॉटिंघममध्ये खेळल्या गेलेल्या या सामन्यात झिम्बाब्वे संघाने प्रथम फलंदाजी करताना ६ गडी बाद २३९ धावा केल्या होत्या. यामध्ये कर्णधार डंकन फ्लेचरने ८४ चेंडूत ५ चौकरांच्या साहाय्याने ६९ धावा केल्या होत्या. तसेच ८ व्या क्रमांकावर फलंदाजी करण्यासाठी आलेल्या लॅन बुचार्टने ३८ चेंडूत ३४ धावांची खेळी केली होती. तर ऑस्ट्रेलियन संघाकडून गोलंदाजी करताना डेनिस लिलीला २ गडी बाद करण्यात यश आले होते.
डंकनची अष्टपैलू कामगिरी
झिम्बाब्वे संघाने दिलेल्या २४० धावांचे आव्हान पूर्ण करणे ऑस्ट्रेलियन संघासाठी काही मोठी गोष्ट नव्हती. या संघात अनेक दिग्गज खेळाडू होते. परंतु तो दिवस डंकन फ्लेचरचा होता. ३४ वर्षीय फ्लेचरने फलंदाजीमध्ये उत्कृष्ट कामगिरी केल्यानंतर त्याने गोलंदाजीमध्येही चमकदार कामगिरी केली होती. त्यावेळी सामना ६० षटकांचा असायचा. ६० षटकाअखेर ऑस्ट्रेलियन संघाला ७ बाद २२६ धावा करण्यात यश आले होते.
ऑस्ट्रेलियन संघाकडून वेसेल्स याने सर्वाधिक ७६ धावांची खेळी केली होती. परंतु या धावा करण्यासाठी त्याने १३० चेंडू खेळले होते. याव्यतिरिक्त यष्टीरक्षक फलंदाज रोडनी मार्शने ४२ चेंडूत नाबाद ५० धावांची खेळी केली होती. त्याने या खेळीत ३ चौकार आणि २ खणखणीत षटकार लगावले होते. परंतु, तो ऑस्ट्रेलियन संघाला विजय मिळवून देऊ शकला नाही. तसेच झिंबाब्वे संघाकडून फ्लेचरने १२ षटकात १ निर्धाव षटक फेकून ४२ धावा खर्च करत ४ गडी बाद केले होते. याच वर्षी कपिल देव यांच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने विश्वचषक जिंकला होता.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या –
भारतीय संघाचे कर्णधारपद मिळताच हे काय बोलून गेला पंत; म्हणाला, ‘चांगल्या परिस्थितीत आले नाही…’
पाकिस्तानच्या ‘फ्लाईंग खान’ने हवेत उडी घेत एकाच हातात पकडला अफलातून कॅच, Video पाहाच
‘आयपीएल सुरू होण्यापूर्वीच स्टेनने मला सांगितले होते…,’ उमरानने केला धक्कादायक खुलासा