जागतिक क्रिकेटमधील अनेकांची फेवरेट टीम म्हणजे दक्षिण आफ्रिका. आजही बऱ्याच भारतीयांची आपल्यानंतर दुसरी आवडती टीम म्हणजे हीच प्रोटियाज टीम. मात्र, या दिग्गजांनी भरलेल्या आणि सर्वांच्या आपल्याशा वाटणाऱ्या दक्षिण आफ्रिका टीमला एक मोठा शाप आहे. तो म्हणजे महत्त्वाच्या मॅचेसमध्ये कच खाण्याचा. 1992 वर्ल्डकपच्या सेमीफायनला डकवर्थ लुईस रूलने त्यांच्या पहिल्या फायनलच स्वप्न उद्ध्वस्त केल. 1999 ला ऍलन डोनाल्ड आणि लान्स क्लुसनर यांनी अतातायीपणा केल्याने ऑस्ट्रेलियाविरुद्धची सेमी फायनल टाय झाली. पुढे लीग स्टेटच्या विजयामुळे ऑस्ट्रेलियाला फायनलच तिकीट मिळालं. इथेच त्यांच्यावर चोकर्सचा शिक्का बसला. मात्र, दक्षिण आफ्रिका चोकर्स आहेत हे सिद्ध करणारी घटना त्याच्या पुढच्या वर्ल्डकपला दक्षिण आफ्रिकेतच घडली. या घटनेची जास्त चर्चा होत नाही. आज त्याच घटनेची आठवण ताजी करू.
साल होतं 2003. इतिहासात पहिल्यांदाच दक्षिण आफ्रिकेत वर्ल्डकप होत होता. नेहमीप्रमाणे दक्षिण आफ्रिका यावेळीही फेवरेट्स होती. वर्ल्डकपमधील आजवरच्या साऱ्या कटू आठवणी पुसण्याची त्यांच्याकडे संधी होते. होम कंडिशन आणि मजबूत टीम म्हणून अर्थातच त्यांच पारडं जड होतं. मात्र, वर्ल्डकप सुरू होताच त्यांना धक्का बसला. वेस्ट इंडीजन त्यांना अटीतटीच्या मॅचमध्ये तीन रनांनी हरवलं. केनियाविरुद्ध पुढची मॅच मात्र त्यांनी दणक्यात जिंकली. डकवर्थ-लुईस नावाचा राक्षस पुन्हा एकदा त्यांच्यापुढे आला आणि न्यूझीलंडकडून त्यांना पराभूत व्हावं लागलं. सेटबॅकपेक्षा कमबॅक चांगला हे त्यांनी सिद्ध केलं आणि बांगलादेशला 10 विकेट्सने मात दिली. कॅनडाचाही त्यांच्यासमोर निभाव लागला नाही. शेवटची मॅच होती टेबल टॉपर्स श्रीलंकेविरुद्ध.
त्या वर्ल्डकपला आयसीसीने सुपर सिक्स फॉरमॅट आणलेला. प्रत्येक ग्रूपमधील तीन टीम त्या सुपर सिक्स राऊंडसाठी क्वालिफाय होणार होत्या. वेस्ट इंडीज, बांगलादेश आणि कॅनडा ऑलमोस्ट वर्ल्डकपमधून बाहेर झालेले. बी ग्रूपमधून श्रीलंका आणि केनियाचे स्थान जवळपास नक्की झालेले. ग्रूप मधल्या दोन मॅच राहिलेल्या. एक होती श्रीलंका विरुद्ध दक्षिण आफ्रिका, आणि दुसरी वेस्ट इंडीज विरुद्ध केनिया. यातील फक्त श्रीलंका विरुद्ध दक्षिण आफ्रिका मॅचचेच महत्त्व होते. श्रीलंका सेफ होती. पण, दक्षिण आफ्रिकेला फक्त आणि फक्त विजयाच हवा होता.
डर्बनच्या किंग्समिडवर श्रीलंकन कॅप्टन सनथ जयसूर्याने टॉस जिंकून पहिली बॅटिंग घेतली. ओपनर मार्वन अटापट्टूने दमदार 124 रन्स सेंचुरी आणि अरविंद डिसिल्वाने नेहमीप्रमाणे संकटमोचकाची भूमिका पार पाडत 73 रन्स करून श्रीलंकेला 268 पर्यंत नेले. तो असा काळ होता जेव्हा 270 रन्स चेस होऊ लागलेले. दक्षिण आफ्रिकेला कॉन्फिडन्स होता की, आपण हे रन चेस करू. मात्र, डर्बनमध्ये त्यावेळी फ्लड लाईट्सखाली हे रन चेस होतील का नाही याबाबत काहींना शंका होती.
स्मिथ-गिब्सच्या 65 रन्सच्या ओपनिंगनंतर कर्स्टन आणि कॅलिस झटपट माघारी परतले. 27 व्या ओव्हरच्या शेवटच्या बॉलवर 73 रन केलेला गिब्स आऊट झाला. दक्षिण आफ्रिकेची स्थिती होती 4 विकेट्स 149. डर्बनमध्ये पावसाचे वातावरण तयार झालेले. कोणत्याही क्षणी पाऊस येणार होता. यावेळी देखील डकवर्थ-लुईस रूल आडवा येणार हे त्यांना माहीत होतं. बाउचर आणि कॅप्टन पोलॉकसारखं रनरेटची माहिती घेत होते. दक्षिण आफ्रिकेला ४५ बॉलवर ५७ रन्स हवे असताना पोलॉक रनआऊट झाला.
बाऊचरचे लक्ष सातत्याने डकवर्थ-लुईस टारगेटवर होते. त्याला माहिती दिली गेली होती की, 45 ओव्हरमध्ये पावसामुळे मॅच थांबली तर दक्षिण आफ्रिकेने 229 रन्स बनवायला हवेत. त्या ओव्हरमध्ये पावसाला सुरुवात झालेली. अंपायर कधीही मॅच थांबवू शकत होते. ती ओव्हर मुरलीधरन टाकत असताना पाचव्या बॉलला बाऊचरने सिक्स मारला आणि ड्रेसिंग रूमकडे हातवारे करत जिंकल्याचा अविर्भाव दाखवला. पुढचा बॉल मुरलीधरनने पटकन टाकला. ज्यावर एक रन शक्य असतानाही बाऊचर आणि क्लुसनर धावलेच नाहीत, आणि इथेच घात झाला.
खरंतर 45 ओव्हरमध्ये 229 रन्सनंतर मॅच टाय होणार होती आणि जिंकण्यासाठी 230 रन्स हवे होते. आणखी एक रन पाहिजे, हे सांगायला ट्वेल्थमन निकी बोए जाण्याआधीच मुरलीधरनने बॉल टाकलेला. बाऊचरचं गणित चुकलेलं. मॅच तिथे थांबली. पावसाचा जोर वाढला. शेवटी 10 वाजून 45 मिनिटांनी अंपायरने मॅच टाय म्हणून घोषित केली. दक्षिण आफ्रिकेला आपल्याच देशात या लाजीरवाण्या पराभवाला सामोरे जावे लागलेल. मॅच टाय झाली तरी तो दक्षिण आफ्रिकेचा पराभवच होता. कारण, नेट रनरेटच्या जोरावर न्यूझीलंड सुपर सिक्समध्ये पोहोचलेली. यजमान दक्षिण आफ्रिका वर्ल्डकप मधून बाहेर झालेली. या साऱ्यात ड्रेसिंग रूममध्ये हताश बसलेल्या शॉन पोलॉकचा चेहरा ना दक्षिण आफ्रिका क्रिकेट फॅन्स विसरणार, ना जगभरातील कोणताही सच्चा क्रिकेट फॅन!!!
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
खेळाडूंनी 7 जन्म घेतले, तरीही क्रिकेट जगतातील ‘हे’ विक्रम तुटणे केवळ अशक्यच; तुम्हीही घ्या जाणून
जेव्हा क्रिकेटच्या इतिहासात पहिल्यांदा खेळलेल्या 2 टीम इंडिया, जाणून घ्या काय लागलेला निकाल