रायपूर येथे काल (२१ मार्च) रोड सेफ्टी वर्ल्ड सिरिजचा अंतिम सामना संपन्न झाला. या सामन्यात इंडिया लिजेंड्सने श्रीलंका लिजेंड्सचा १४ धावांनी पराभव करत, पहिल्यांदाच आयोजित केलेल्या या स्पर्धेचे विजेतेपद पटकावले. भारताचा माजी अष्टपैलू युवराज सिंग याने भारतीय संघाच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली. संपूर्ण स्पर्धेत आपल्या आक्रमक फलंदाजीने, कामचलाऊ गोलंदाजीने व नेत्रदीपक क्षेत्ररक्षणाने सर्वांची मने जिंकली. विजयी संघाचा भाग बनताच युवराज सिंगच्या कारकिर्दीत आणखी एक मानाचे पान जोडले गेले.
इतक्या महत्त्वपूर्ण स्पर्धेचे मिळवले विजेतेपद
भारताच्या निवृत्त झालेल्या माजी क्रिकेटपटूंच्या संघाने रोड सेफ्टी वर्ल्ड सिरीजच्या पहिल्या हंगामाचे विजेतेपद पटकावले. भारताचा सर्वकालीन महान फलंदाज सचिन तेंडुलकर या संघाचे नेतृत्व करत होता. इंडिया लिजेंड्स संघात युवराज सिंग हा देखील समाविष्ट होता. इंडिया लिजेंड्सने विजेतेपद मिळविल्यानंतर युवराज सिंगच्या खात्यात आणखी एका मोठ्या स्पर्धेच्या विजेतेपदाची भर पडली.
युवराज हा असा एकमेव क्रिकेटपटू आहे ज्याने आपल्या कारकीर्दीत सर्व प्रमुख स्पर्धांची जेतेपदे उंचावली आहेत. २००० मध्ये भारताच्या एकोणीस वर्षाखालील मुलांच्या क्रिकेट संघाने जिंकलेल्या विश्वचषकात तो भारतीय संघाचा सदस्य होता. त्यापाठोपाठ, २००२ मध्ये श्रीलंकेसोबत संयुक्तरित्या चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकलेल्या भारतीय संघातही त्याने सहभाग नोंदविलेला.
साल २००७ मध्ये प्रथमच आयोजित झालेल्या टी२० विश्वचषकात विजयी ठरलेल्या भारतीय संघात त्याने महत्त्वपूर्ण भूमिका बजावलेली. तब्बल २८ वर्षानंतर भारतीय संघाने २०११ मध्ये वनडे विश्वचषक आपल्या नावे केला होता. या विश्वचषकात युवराजला स्पर्धेचा मानकरी घोषित करण्यात आलेले.
प्रमुख आंतरराष्ट्रीय स्पर्धानंतर २०१६ मध्ये त्याने सनरायझर्स हैदराबादसोबत आयपीएलचे विजेतेपद पटकावले. २०१९ मध्ये मुंबई इंडियन्ससाठी देखील आयपीएल विजेता होण्याचा मान त्याला मिळाला. २०१९-२०२० मध्ये अबुधाबी येथे खेळल्या गेलेल्या अबुधाबी टी१० लीगमध्ये मराठा अरेबियन संघाचे प्रतिनिधित्व करताना त्याने संघाला विजेतेपद मिळवून दिले. आता, रोड सेफ्टी वर्ल्ड सिरीजचा चषक उंचावून आपल्या कारकीर्दीत आणखी एका मोठ्या विजयाची नोंद केली.
युवराजची अष्टपैलू कामगिरी
युवराजने रोड सेफ्टी वर्ल्ड सिरीजमध्ये अष्टपैलू कामगिरीची नोंद केली. युवराजने स्पर्धेत ७ सामने खेळताना ६४.६६ च्या लाजवाब सरासरीने १९४ धावा ठोकल्या. त्याचा स्ट्राईक रेट हा १७० असा दमदार होता. युवराजने स्पर्धेत सर्वाधिक १७ षटकारांची बरसात केली. त्याने ४ बळी देखील आपल्या नावे केले.
महत्त्वाच्या बातम्या-
अन् दस्तरखुद्द आनंद महिंद्रा यांनी शब्द पाळला; सोशल मीडियावर होतंय कौतुक
भारत-पाक मालिका ‘जिन्ना-गांधी’ यांच्या नावाने व्हावी; पीसीबीच्या माजी अध्यक्ष्यांचे निवेदन