इंडियन प्रीमीयर लीगची क्रिकेटमधील सर्वात श्रीमंत क्रिकेट लीगमध्ये गणना केली जाते. अनेक खेळाडूंना आयपीएलमध्ये कोट्यावधी रुपये मिळाले आहेत. आयपीएलमुळे अनेक गरीब घरातून आलेले खेळाडू चांगले कमाई करु लागले आहेत. अगदी छोट्या गावापासून ते शहरापर्यंत अनेक खेळाडूंना यात संधी मिळाली आहे.
असे असताना आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील स्टार खेळाडूंनी तर आत्तापर्यंत कोट्यावधी रुपये कमावले आहेत. आयपीएलमधून आत्तापर्यंत १०० कोटीपेक्षा जास्त कमाई केलेल्या खेळाडूंमध्ये ३ भारतीय खेळाडू आहेत. विषेश म्हणजे त्यांनी हा १०० कोटींचा आकडा त्यांना त्यांच्या संघाकडून प्रत्येकवर्षी मिळणाऱ्या वेतनाच्या आधारावर पार केला आहे. यात त्यांच्या जाहीराती, प्रायोजक अशा अन्य गोष्टीतूंन होणाऱ्या कमाईचा समावेश नाही. याच खेळाडूंचा घेतलेला आढावा –
१. एमएस धोनी –
भारताचा यष्टीरक्षक फलंदाज एमएस धोनीने आत्तापर्यंत आयपीएलमधून सर्वाधिक कमाई केली आहे. तो २००८ मधील सर्वात महागडा खेळाडू ठरला होता. त्याला २००८ ला झालेल्या आयपीएलच्या पहिल्या मोसमासाठी चेन्नई सुपर किंग्सने ६ कोटी रुपये देऊन संघात घेतले होते. तेव्हापासून गेले ११ मोसमात चेन्नई सुपर किंग्सचा केवळ भागच नाही तर कर्णधार देखील आहे.
फक्त २०१६ आणि २०१७ या २ आयपीएल मोसमात तो रायझिंग पुणे सुपरजायंट्सकडून खेळला. कारण त्या २ मोसमासाठी चेन्नई सुपर किंग्स आणि राजस्थान रॉयल्स या २ संघांवर बेटिंग आणि स्पॉट फिक्सिंग प्रकरणी बंदी आली होती.
धोनीला २०१० पर्यंत चेन्नईकडून प्रत्येकवर्षी ६ कोटी रुपये मिळत होते. त्यानंतर २०११ ते २०१३ पर्यंत त्याला ८ कोटी २८ लाख रुपये प्रत्येकवर्षी चेन्नईकडून मिळाले. तर २०१४ आणि २०१५ साठी त्याच्यावर चेन्नई सुपर किंग्सने प्रत्येकी १२.५ कोटी रुपये खर्च केला. तसेच २०१६ आणि २०१७ पुणे संघाकडूनही धोनीला प्रत्येकी १२.५ कोटी रुपये मिळाले.
यानंतर चेन्नईने आयपीएलमध्ये पुनरागमन केल्यानंतर त्यांनी धोनीला १५ कोटी रुपये देत संघात कायम केले. धोनीला २०१८ पासून आत्तापर्यंत चेन्नई प्रत्येकवर्षी १५ कोटी रुपये देत आहे. धोनीने आत्तापर्यंत आयपीएलमध्ये १९० सामने खेळताना ४४३२ धावा केल्या आहेत.
२. रोहित शर्मा –
धोनीपाठोपाठ आयपीएलमध्ये सर्वाधिक कमाई करणाऱ्यांमध्ये मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्मा आहे. रोहितला मुंबई संघाबरोबर असताना मोठे यश मिळाले असले तरी त्याचा आयपीएलमधील प्रवास डेक्कन चार्जर्स संघापासून सुरु झाला होता. त्याला डेक्कन चार्जर्सने २००८ च्या आयपीएलमध्ये ३ कोटी रुपये मोजत संघात घेतले होते. तो २०१० पर्यंत डेक्कनकडून खेळला.
विशेष म्हणजे २००९ ला जेव्हा डेक्कनने आयपीएलचे विजेतेपद मिळवले तेव्हाही तो त्यांच्या संघाचा भाग होता. त्याला २०११ ला मुंबई इंडियन्सने ९ कोटी २० लाख रुपये मोजत संघात घेतले. त्याला २०१३ पर्यंत ९ कोटी २० लाख मुंबई इंडियन्स देत होते. त्यानंतर २०१४ ते २०१७ पर्यंत मुंबईने त्याला संघात कायम ठेवताना १२.५ कोटी रुपये प्रत्येकवर्षी मोजले.
२०१८ पुन्हा एकदा मुंबईने १५ कोटींचा करार करत त्याला संघात कायम केले. रोहितने आत्तापर्यंत १८८ आयपीएल सामन्यात ४८९८ धावा केल्या आहेत. तसेच रोहितच्या नेतृत्वाखाली मुंबईने सर्वाधिक ४ वेळा आयपीएल विजेतेपद मिळवले आहे.
३. विराट कोहली –
भारतीय संघाचा सध्याचा कर्णधार विराट कोहली रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाचाही कर्णधार आहे. तो आयपीएलच्या पहिल्या मोसमापासून बेंगलोर संघाकडून खेळत आहे. कर्णधार म्हणून २००८ चा १९ वर्षांखालील विश्वचषक जिंकून आलेल्या युवा विराटला बेंगलोरने २००८ च्या आयपीएल मोसमासाठी १ कोटी २० लाखाला खरेदी केले होते. हीच रक्कम त्याला पुढील २ मोसमही मिळाली.
त्यानंतरही बेंगलोरने त्याला कायम करत २०११ ते २०१३ पर्यंत ८ कोटी २८ लाख रुपये प्रत्येक वर्षी दिले. या दरम्यान त्याला बेंगलोरचे कर्णधारपदही मिळाले. २०१४ ते २०१७ दरम्यान बेंगलोरने त्याच्यासाठी प्रत्येकवर्षी १२.५ कोटी रुपये मोजले.
तर २०१८पासून त्यांनी त्याला संघात कायम करताना १७ कोटी देण्याचा निर्णय घेतला. विराट हा आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा करणारा क्रिकेटपटू आहे. त्याने १७७ सामन्यात ५४१२ धावा केल्या आहेत.