आयपीएल २०२० चा नववा सामना रविवारी (२७ सप्टेंबर) राजस्थान रॉयल्स विरुद्ध किंग्स इलेव्हन पंजाब संघात झाला. हा सामना राजस्थान रॉयल्स संघाने ४ विकेट्सने जिंकला. राजस्थानचा हा या हंगामातील दुसराच सामना होता. त्यांनी यापूर्वी चेन्नई सुपर किंग्सविरुद्ध झालेल्या सामन्यातही विजय मिळविला होता.
प्रथम फलंदाजी करताना पंजाब संघाने २ विकेट्स गमावत २२३ धावा केल्या होत्या. पंजाब संघाने दिलेल्या २२४ धावांचे आव्हान राजस्थान संघाने १९.३ षटकातच पूर्ण केले. यादरम्यान राजस्थान संघाकडून फलंदाजी करताना राहुल तेवतियाने एक विक्रम आपल्या नावावर केला.
त्याने ३१ चेंडू खेळताना ७ षटकारांच्या मदतीने ५३ धावांची अर्धशतकी खेळी केली. त्याचे आयपीएलमधील हे पहिलेच अर्धशतक होते. हे अर्धशतक करताना त्याने शेल्डन कॉट्रेलच्या गोलंदाजीवर एका षटकात ५ षटकार ठोकत षटकार किंग युवराज सिंगची आठवण करून दिली.
या षटकारांसह त्याने युनिव्हर्सल बॉस ख्रिस गेलच्या विक्रमाची बरोबरी केली आहे. यापूर्वी गेलनेही २०१२ मध्ये पुणे वॉरिअर्सविरुद्ध खेळताना राहुल शर्माच्या गोलंदाजीवर एका षटकात ५ षटकार ठोकण्याचा कारनामा केला होता.
आयपीएलमध्ये एका षटकात ५ षटकार ठोकणारे फलंदाज
२०२०*- राहुल तेवतिया (राजस्थान रॉयल्स) विरुद्ध किंग्स इलेव्हन पंजाब
२०१२- ख्रिस गेल (रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर) विरुद्ध पुणे वॉरिअर्स






