टी २० विश्वचषकाच्या सुपर १२ सामन्यांना शनिवारी (२३ ऑक्टोबर) सुरुवात झाली. दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात सुपर १२ चा पहिला सामना खेळवला गेला. ऑस्ट्रेलियाने टी -२० विश्वचषकामध्ये आपल्या मोहिमेची सुरुवात विजयासह केली. ऍरॉन फिंचच्या नेतृत्वाखालील संघाने सुपर-१२ च्या पहिल्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा ५ गडी राखून पराभव केला. दरम्यान, या सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा यष्टीरक्षक फलंदाज क्विंटन डी कॉक ज्या पद्धतीने बाद झाला त्यामुळे सर्वजण चक्रावून गेले.
अबू धाबीच्या शेख जायद स्टेडियमवर झालेल्या या सामन्याच्या पाचव्या षटकात हा गमतीदार प्रसंग घडला. वेगवान गोलंदाज जोश हेझलवूड गोलंदाजी करत होता. दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार क्विंटन डी कॉक फलंदाजी करत होता. त्यावेळी दक्षिन आफ्रिकेने २ गडी गमावून २३ धावा केल्या होत्या.
डी कॉकने चेंडू फाईन लेगच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न केला, पण चेंडू त्याच्या थाय पॅडला लागला आणि टप्पा खाऊन स्टंपवर जावून आदळला. त्यावेळी तो धाव घेण्याच्या विचाराने पुढे निघून आला होता. त्यामुळे त्याला चेंडू स्टंपला लागण्यापासून वाचवण्याचीही संधी मिळाली नाही. त्यामुळे, त्याला त्याची विकेट गमवावी लागली.
https://www.instagram.com/reel/CVXh4d-l7OQ
या सामन्यात प्रथम फलंदाजी करणारा दक्षिण आफ्रिकेचा संघ २० षटकांत ९ गडी गमावून ११८ धावा करू शकला. त्यानंतर मिळालेल्या ११९ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियन संघाची सुरुवात खराब झाली आणि त्यांनी २ विकेट अवघ्या २० धावांवर गमावल्या. कर्णधार फिंच खाते न उघडता माघारी परतला. एन्रीच नॉर्किएच्या चेंडूवर रबाडाने त्याचा झेल टिपला. ज्यामुळे संघाची पहिली विकेट ४ धावांवर पडली.
त्यानंतर डेविड वॉर्नरला (१४) रबाडाने क्लासेनच्या हाती झेलबाद केले. वॉर्नरने आपल्या १५ चेंडूंच्या खेळीत ३ चौकार मारले. तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला आलेला मिचेल मार्श (११)ही फार काही करू शकला नाही आणि तो केशव महाराजचा बळी ठरला. मार्शने १७ चेंडू खेळले आणि १ चौकार मारला.
त्यानंतर माजी कर्णधार स्टीव्ह स्मिथ आणि ग्लेन मॅक्सवेलने डाव पुढे नेला आणि चौथ्या विकेटसाठी ४२ धावा जोडल्या. जेव्हा दोघे खेळपट्टीवर स्थिर झाले, तेव्हा नॉर्किएने डावाच्या १५ व्या षटकात ही भागीदारी तोडली. त्याने या षटकाच्या ५ व्या चेंडूवर मार्करामच्या हाती स्मिथला (३५) झेलबाद केले. स्मिथने ३४ चेंडूत ३ चौकार मारले. त्यानंतर ग्लेन मॅक्सवेलला पुढील षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर तबरेज शम्सीने त्रिफळाचीत केले. मॅक्सवेलने २१ चेंडूत १ चौकाराच्या मदतीने १८ धावा केल्या.
अखेरच्या षटकात ऑस्ट्रेलियाला विजयासाठी ८ धावांची गरज होती. ड्वेन प्रिटोरियसच्या या षटकाच्या पहिल्या चेंडूवर, मार्कस स्टॉयनिसने २ धावां घेतल्या आणि पुढच्याच चेंडूवर त्याने शानदार चौकार मारला. तिसऱ्या चेंडूवर एकही धाव झाली नाही, पण चौथ्या चेंडूवर स्टॉयनिसने विजयी चौकार मारला आणि धावसंख्या १२१ धावांपर्यंत पोहोचवली. तो १६ चेंडूत ३ चौकारांच्या मदतीने २४ धावा काढून नाबाद परतला. त्याने मॅथ्यू वेड (१५) सोबत सहाव्या विकेटसाठी ४० धावांची नाबाद भागीदारीही केली.
What happened there? ???? #T20WorldCup #AUSvSA https://t.co/X8Yuf0q9Yw
— T20 World Cup (@T20WorldCup) October 23, 2021
तत्पूर्वी दक्षिण आफ्रिकेकडून एडेन मार्करमने एकाकी झुंज देताना ४० धावांची खेळी केली. पण, त्याला अन्य फलंदांजांची चांगली साथ मिळाली नाही. त्यातही डीकॉक दुर्दैवीरित्या बाद झाला. त्यामुळे त्यांना ११८ धावाच करता आल्या. सामन्यात १९ धावांत २ बळी घेणारा वेगवान गोलंदाज जोश हेझलवूडला सामनावीर म्हणून गौरवण्यात आले.
महत्त्वाच्या बातम्या –
भारत टी२० विश्वचषक जिंकू शकतो; पण ‘या’ तीन संघांपासून रहावे लागेल सावध, सुरेश रैनाचे मत
तब्बल तीन वर्षांपासून फुस्स ठरतोय फिंच; नावावर झाली ही लाजीरवाणी आकडेवारी






