-आदित्य गुंड ([email protected])
परवाच्या मॅचमध्ये भन्नाट कॅच पकडून तू भल्याभल्यांना नुसती बोटेच नाही तर अख्खा हात तोंडात घालायला भाग पाडलेस. तुझी स्पायडरमॅनशी तुलना करायला त्यांना वेळ लागला नाही. त्या एका कॅचने तुझ्यावर अबालवृद्धांच्या कौतुकाचा वर्षाव झाला.
अगदी गल्लीतल्या पोरांपासून ते विराट कोहलीसारख्या खेळाडूपर्यंत सगळ्यांनी तुला डोक्यावर घेतले. क्षेत्ररक्षणाचा बादशहा म्हणून ज्याचे नाव घेतले जाते त्या जॉन्टी ऱ्होड्सने देखील तुझे कौतुक केले. व्हाट्सअप ग्रुप्सवर चर्चा झडल्या. तू मात्र तुझ्या स्वभावाप्रमाणे स्थितप्रज्ञच राहिलास. खरं सांगू? अनेकदा तुझं हेच वागणं लोकांना भावतं आणि ते तुझे चाहते होतात. तुझी फलंदाजी फारशी न पाहिलेले लोकही तुझ्या चाहत्यांच्या यादीमध्ये असतात.
एखाद्या क्रिकेटपटूने किती परिपूर्ण असावं याचा वस्तुपाठ तू घालून दिलास. कसोटीमधून पदार्पण केलेल्या तू लवकरच दक्षिण आफ्रिकेच्या एकदिवसीय आणि टी२० संघातही स्थान मिळवले. ते होणारच होते. तुझी ती नजाकतदार फलंदाजी, नाविन्यपूर्ण फटके बघताना लोक टीव्हीसमोर खिळून बसत, अजूनही बसतात.
तू फलदांजी करत असताना समालोचकांच्या भाषिक प्रतिभेला धुमारे फुटतात. यातून मग अगदी हर्षा आणि गावसकरसारखे मात्तबरही सुटत नाहीत. फलंदाजी करताना तू जी तोडफोड करतोस ती पाहून लोकांना गोलंदाजांची दया येते. मला तर वाटतं तू ज्या गोलंदाजांना फटकावतो त्यांना वाईटही वाटत नसेल. उलटपक्षी तेही तुझी नयनमोहक फलंदाजी पाहण्याचा आनंद लुटत असतील.
संघासाठी वेळ पडेल तेव्हा तू यष्टिरक्षण केलेस, वेगवेगळ्या क्रमांकांवर फलंदाजीला आलास, ऑस्ट्रेलियामध्ये संघ पराभवाच्या छायेत असताना स्वतःच्या नैसर्गिक खेळाला मुरड घालत २४६ चेंडूत ३३ धावा काढत सामना अनिर्णित ठेवलास, पुढच्या सामन्यात त्याच ऑस्ट्रेलियन गोलंदाजांना पाणी पाजत २२५ चेंडूत १६९ धावा करत ऑस्ट्रेलियाला ऑस्ट्रेलियात हरवलेस. एका माणसाने काय काय करावे ना! मी तुला एकदिवसीय क्रिकेटमधले सगळ्यात वेगवान शतक करताना पाहिले आणि माझ्या मनात तुझ्याबद्दल आधीच असलेला आदर कित्येक पटींनी वाढला.
वेस्ट इंडिज विरुद्धच्या त्या सामन्यात ३९ व्या षटकात फलंदाजीला येऊन केवळ ३१ चेंडूत तू शतक पूर्ण केले होतेस. वेस्टइंडिजच्या गोलंदाजांना कुठे चेंडू टाकू हे कळेनासे झाले होते. तुझ्या नावावरच्या विक्रमांची यादी काढायची म्हटले तर दमछाक होईल.
एकदिवसीय क्रिकेटमधील वेगवान अर्धशतक, शतक, दीडशतक, एकदिवसीय,कसोटी, प्रथम श्रेणी आणि अ श्रेणीच्या क्रिकेटमध्ये ५० हून जास्त सरासरी असे कितीतरी विक्रम तू स्वतःच्या नावावर केलेस. मला तर वाटतं क्रिकेटमधल्या सांख्यिकीकारांसाठी तुझी कारकीर्द म्हणजे एक खजिनाच आहे. तुझ्या अफाट प्रतिभेमुळे क्रिकेटच्या सार्वकालिक महान फलंदाजांमध्ये तुझे नाव नक्की घेतले जाईल.
आयपीएलमुळे भारतातही तुझे करोडो चाहते निर्माण झाले. सचिन, धोनी, कोहली यांसारख्या खेळाडूंच्या बरोबरीने तुझ्यावर भारतीयांनी प्रेम केले. भारतातील कोणत्याही मैदानावर तू फलंदाजीला आलास की “एबीडी एबीडी” असा जयघोष होतो. भारताबाहेरील इतर कोणत्याही खेळाडूला असे प्रेम भारतामध्ये लाभले नाही.
आपल्या कारकिर्दीत दक्षिण आफ्रिकेला अनेक विजय मिळवून देणाऱ्या तुला विश्वकरंडकात मात्र संघाला विजय मिळवून देता आला नाही. न्यूझीलंडविरुद्ध २०१५ च्या विश्वकरंडकात दक्षिण आफ्रिकेचा पराभव झाला तेव्हा तुझ्या डोळ्यातले अश्रू पाहून तुझे कित्येक चाहते तुझ्याबरोबर रडले होते. त्यांना त्यांचा “एबी” जिंकायला हवा होता. त्या सामन्यानंतर अनेकांनी “यार त्या डिव्हिलियर्ससाठी तरी साऊथ आफ्रिका जिंकायला पाहिजे होती” असे म्हटले होते.
कालही सारे काही आलबेल असताना अचानक निवृत्तीची घोषणा करून तू सगळ्यांना चकित केले. तू लवकरच निवृत्त होणार असा अनेकांचा होरा होताच. मात्र किमान २०१९ चा विश्वकरंडक खेळशील अशी अनेकांची अपेक्षा होती.एकदिवसीय क्रिकेटमध्ये १०००० धावा पूर्ण करण्यासाठी तुला फक्त ४२३ धावांची गरज होती.
एरवी धावांची टांकसाळ उघडणाऱ्या तुला एवढ्याशा धावा करणे जड गेले नसते. आजकालच्या निवृत्तीसाठी मुहूर्त पाहणाऱ्या खेळाडूंच्या जमान्यात तू मात्र निःस्वार्थीपणे निवृत्ती स्वीकारून आदर्श घालून दिलास. तुझ्या या कृतीने तुझ्या चाहत्यांच्या मनात तू कायमच घर करून राहशील. समाजामध्ये माजलेल्या किडीचे निराकरण करण्यासाठी बरेच जण आजकाल “राजे तुम्ही जन्म घ्या” असे म्हणताना दिसतात.याच धरतीवर तू निवृत्त झाल्यावर तुझे चाहते “एबी तू पुन्हा खेळायला ये” असं नक्की म्हणतील.
महत्त्वाच्या बातम्या-
-आयपीएल 2018 मध्ये या 6 खेळाडूंची आहे गोलंदाजांमध्ये दहशत
-सचिन, रोहितनंतर मोठा पराक्रम करण्याची संधी मुंबईकर रहाणेकडून हुकली!
-भारतीयांचं सर्वाधिक प्रेम मिळालेला परदेशी खेऴाडू आंतराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त!