पुणे – भारतातील अग्रगण्य ऊर्जा उत्पादक कंपनी इंडीयन ऑईल यांनी प्रायोजित केलेल्या व आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ संघटना(फिडे)यांनी आयोजित केलेल्या दुसऱ्या चेस फॉर फ्रीडम परिषदेचे आयोजन येत्या 19 ते 21 जुन दरम्यान पुणे येथे करण्यात आले आहे.
फिडेच्या वतीने अखिल भारतीय बुद्धिबळ संघटना आणि महाराष्ट्र बुद्धिबळ संघटना यांनी या परिषदेचे आयोजन केले असून विविध ठिकाणी तुरुंगात असलेल्या जगभरातील बंदीवानांच्या पुनर्वसनासाठी बुद्धिबळ या खेळाचा कशा प्रकारे उपयोग करता येईल, यासंबंधी जगातील विविध देशांमधून आलेले तज्ञ चर्चा करणार आहेत.
या वेळी उपस्थित येरवडा कारागृहाच्या उपमहानिरीक्षक स्वाती साठे यांनीही आपल्या भावना व्यक्त केल्या. “आम्हाला कैद्यांना बाहेर पडल्यावर पुन्हा समाजात चांगल्या पद्धतीने समोर आणायचे आहे. यासाठी माणसाची मानसिकता बदलण्यासाठी खेळ हे एक उत्तम माध्यम आहे. इंडियनऑइल चे कौशल्य आणि कल्पना आणि आमच्या कैद्यांनी एकत्र येऊन इतिहास घडवला. बाहेर राहणाऱ्या खेळाडूला जमणार नाही, ते आमच्या खेळाडूंनी करुन दाखवले आहे. सुधारणा आणि पुनर्वसन हे जेल प्रशासनाचे ब्रीदवाक्य या कैद्यांनी खरे करुन दाखवले. त्याचा हा एक महत्वाचा टप्पा आहे. सध्या येरवडा कारागृहआत पुरुष आणि महिला असे एकूण 200 कैदी बुद्धिबळ शिकत आहेत. असे कारागृहाच्या उपमहानिरीक्षक स्वाती साठे यांनी सांगितले.
या परिषदेबद्दल माहिती देताना ग्रँडमास्टर आणि इंडियन ऑइल मुख्य व्यवस्थापक (कर्मचारी सेवा आणि क्रीडा)अभिजीत कुंटे म्हणाले की, ‘दुसरा चेस फॉर फ्रीडम १९ जूनपासून या परिषद सुरुवात होणार आहे. यामध्ये चर्चासत्रे, परिसंवाद आणि मुलाखती याचा समावेश आहे. आभासी (ऑनलाईन) पद्धतीने होणाऱ्या या चर्चासत्रात जगभरातील तज्ज्ञ उपस्थित राहणार आहेत.’ हा उपक्रम आणि बुद्धिबळ स्पर्धांचा कार्यक्रम इंडियन ऑईलच्या वतीने पुरस्तृत करण्यात येणार आहेत. यावेळी एमसीएचे मानद सचिव निरंजन गोडबोले, इंडियन ऑईलच्या वेस्टर्न रिजन कार्यालयाच्या(कॉर्पोरेट कम्युनिकेश)चे सरव्यवस्थापक झुबीन गर्ग आदी मान्यवर उपस्थित होते.
चेस फॉर फ्रीडम या प्रकल्पाचा विविध देशांमध्ये कशा प्रकारे यशस्वी उपयोग करण्यात आला आहे, हा प्रकल्प भारतात कशा प्रकारे राबविता येईल, राष्ट्रीय स्तरावर विविध बंदी वाणांच्या अभ्यासातून या प्रकप्लाचा कशा प्रकारे उपयोग करता येईल आणि विविध ठिकाणी बंधिवासात असलेल्यांचे संघ तयार करून आंतर खंडीय स्पर्धा कशा घेता येईल या सर्व विषयांवर या परिषदेत चर्चा करणार आहेत.
क्रीडा क्षेत्राच्या माध्यमातून सकारात्मक सामाजिक बदल घडविण्यासाठी आणि भारताला क्रिडा क्षेत्रातील आघाडीचा देश बनविण्यासाठी इंडियन ऑईलचे योगदान नेहमीच महत्वपूर्ण राहिले आहे. ‘परिवर्तन – प्रिझन टू प्राईड आणि नई दिशा’ या अशा उपक्रमाच्या माध्यमातून सामाजिक जबाबदारी आणि संक्रमणात्मक बदल यासाठी इंडियन ऑईल क्रांतिकारक सहभाग देत असते. याआधी ऑक्टोबर 2023मध्ये पार पडलेल्या तिसऱ्या बंदीवानांच्या आंतर खंडीय ऑनलाईन बुद्धिबळ स्पर्धेत इंडियन ऑईलच्या परिवर्तन उपक्रमा अंतर्गत प्रशिक्षण देण्यात आलेल्या पुण्याच्या येरवडा मध्यवर्ती कारागृहातील बंदीवानांच्या संघाने एल साल्वादोरचा पराभव करून सुवर्णपदक पटकावले. तसेच, याच दरम्यान पार पडलेल्या आंतर खंडीय चेस फॉर फ्रीडम ऑनलाईन बुद्धिबळ स्पर्धेतील युवकांच्या गटात भोपाळच्या बाल सुधारगृहाच्या संघाने सुवर्णपदक पटकावून या उपक्रमाचे महत्व अधोरेखित केले होते.
शासन मान्यतेने सदर परिषदेचा पहिला टप्पा म्हणुन फिडे प्राधिकृत परदेशी प्रतिनिधींचे शिष्टमंडळ येरवडा मध्यवर्ती कारागृहास दि.१९.०६.२०२४ रोजी सकाळी १०.०० वा. भेट देऊन स्पर्धेत भाग घेतलेल्या बंद्यांशी संवादसाधणार आहेत. तसेच महिला व पुरुप बंद्यांसोबत प्रातिनिधिक स्वरुपात त्यांचेसोबत बुध्दीबळ खेळणार आहेत व तद्नंतर हॉटेल अँड हयात येथे सदर परिषदेचा पुढचा टप्पा आयोजित करण्यात आला आहे. सदर कारागृह भेटीदरम्यान मा. श्री. अमिताभ गुप्ता (भा.पो.से) अपर पोलीस महासंचालक व महानिरीक्षक, कारागृह व सुधारसेवा, महाराष्ट्र राज्य, पुणे, मा. डॉ. श्री. जालिंदर सुपेकर (भा.पो.से) विशेष पोलीस महानिरीक्षक (मुख्यालय) कारागृह व सुधारसेवा, महाराष्ट्र राज्य, पुणे व मा. श्रीमतो. स्वाती साठे, कारागृह उपमहानिरीक्षक, पश्चिम विभाग, येरवडा, पुणे तसेच इंडीयन ऑईल कॉ. लिमिटेड यांचेकडील सुश्री रश्मी गोविल, संचालक (मानव संसाधन) व फिडे चे सामाजिक आयोगाचे अध्यक्ष, आंद्रे वोगेटलिन, नितीन नारंग, अध्यक्ष, अखिल भारतीय बुद्धिबळ संघटना व फिडे प्राधिकृत परदेशी प्रतिनिधीचे शिष्टमंडळ उपस्थित राहणार आहेत.