झिम्बाब्वेचा ब्लेसिंग मुझारबानी आणि श्रीलंकेच्या दसून शनाका यांनी पाकिस्तान सुपर लीग (पीएसएल) २०२६ च्या हंगामाचा करार धुडकावत इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) २०२६ च्या हंगामामध्ये खेळण्याचा निर्णय घेतला. आता आणखी एक खेळाडू त्यांच्या मार्गावर आहे. दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज ओटनील बार्टमन हा पण पीएसएलकडे दुर्लक्ष करत आयपीएलमध्ये सहभागी होण्याची दाट शक्यता आहे.
ओटनीलने मागील आठवड्यातच पीएसएलमधून माघार घेतली आहे. त्याला हैद्राबाद किंग्समेनने करारबद्ध केले होते. त्याने आता माघार घेतल्याने फ्रॅंचायजी त्याच्या बदली खेळाडूच्या शोधात आहे.
चेन्नई सुपर किंग्जमधून नॅथन एलिस हंगामातून बाहेर पडला आहे. ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज एलिस हॅमस्ट्रिंगच्या दुखापतीमुळे स्पर्धेतून बाहेर झाला आहे. आता त्याच्याजागी बार्टमन चेन्नईमध्ये सहभागी होऊ शकतो. त्याने पीएसएलमधून माघार का घेतली हे मात्र समोर आले नाही.
तसेच श्रीलंकेचा कर्णधार दसून शनाका सोमवारीच राजस्थान रॉयल्सच्या संघात आला आहे. त्याला दुखापतग्रस्त इंग्लंडचा अष्टपैलू सॅम करनच्या जागी घेतले आहे. त्याला राजस्थानने २ कोटी रुपयांना संघात घेतले आहे, तसेच त्याला श्रीलंका क्रिकेटने खेळण्यासही मंजुरी दिली आहे. आयपीएलच्या लिलावात विकला न गेल्याने त्याला पीएसएलच्या लाहोर कलंदर्सने घेतले होते.
शनाकाच्या आधी झिम्बाब्वेचा वेगवान गोलंदाज मुझारबानीने पीएसएलचा करार रद्द केला आहे. त्याला आयपीएलमध्ये कोलकाता नाईट रायडर्सने (केकेआर) मुस्तफिजुर रहमान याच्याजागी करारबद्ध केले आहे. भारत-बांग्लादेश यांच्यात असणाऱ्या राजकिय तणावामुळे केकेआरने रहमानचा करार रद्द केला होता. त्यांनी मुझारबानीशी संपर्क साधला. पीएसएलमध्ये मुझारबानीला इस्लामाबाद युनायटेडने करारबद्ध केले होते. त्याने तो रद्द करत आयपीएलला पसंती दिली.
शनाका आणि मुझारबानी यांनी पीएसएलचा करार रद्द केल्याने त्यांच्यावर कायदेशीर कारवाई केली जाणार, असे वक्तव्य पाकिस्तान क्रिकेटचे अध्यक्ष मोहसीन नक्वी यांनी केली होती. आता सलग तिसरा खेळाडू बाहेर झाला आहे.
राजस्थान रॉयल्सचा आयपीएल २०२६ च्या हंगामामधील पहिला सामना ३० मार्चला चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध आहे. तसेच केकेआरचा पहिला सामना २९ मार्चला मुंबई इंडियन्सविरुद्ध आहे.






