पंजाब किंग्सचा (Punjab kings) संघ पहिल्या 7 सामन्यांमध्ये एकही सामना हरला नव्हता. त्यामुळे संघात अतिआत्मविश्वास निर्माण झाल्याचे दिसत होते. हीच चूक शेवटी संघाला महागात पडली. लागोपाठ 6 सामने हरल्यामुळे अखेर पंजाबच्या संघाचे सर्व गणित पूर्णपणे बिघडले. याच कारणामुळे लीग स्टेजचे सामने संपल्यानंतर पंजाब किंग्सचा संघ टॉप-4 मध्ये जागा मिळवू शकला नाही. पंजाब किंग्सच्या संघाने मुल्लांपुरमध्ये खूप चांगली कामगिरी केली होती. मात्र, जसे या संघाचे सामने धर्मशाला येथे शिफ्ट झाले, तसा या फ्रेंचायझीला लागोपाठ पराभवाचा सामना करावा लागला. दोन्ही परिस्थितींचा पंजाबचा संघ फायदा उठवू शकला नाही, उलट त्यांचे नुकसानच झाले.
श्रेयस अय्यरचा संघ जसा लागोपाठ 2 सामने हरला, तसा त्यांच्यावर खूप जास्त दबाव वाढला. अचानक मुख्य प्रशिक्षक रिकी पाँटिंग आणि कर्णधार अय्यर प्लेइंग-11 मध्ये बदल करू लागले, ज्याचा संघावर वाईट परिणाम झाला. मागच्या हंगामात फायनल खेळणारा पंजाब किंग्सचा संघ या सीजनमध्ये वाईट रीतीने फ्लॉप ठरला. त्यातच त्यांच्या गोलंदाजांची कामगिरी अत्यंत निराशाजनक राहिली.
पंजाब किंग्सविरुद्ध जवळपास सर्वच संघांनी 200 धावांचा टप्पा अगदी सहज पार केला. स्पर्धेच्या सुरुवातीला जेव्हा पंजाब किंग्सचा संघ चांगली कामगिरी करत होता, त्यावेळी त्यांच्या टॉप ऑर्डरचे फलंदाज धावा करत होते. पण जसे प्रियांश आर्या, कूपर कोनोली आणि प्रभसिमरन यांच्या बॅटमधून वेगाने धावा येणे बंद झाले, तशी संघाची फलंदाजी पूर्णपणे कोलमडली. मागच्या हंगामात पंजाब किंग्सच्या मिडल ऑर्डरने (मध्यक्रम) भरपूर धावा केल्या होत्या, पण या हंगामात तसे पाहायला मिळाले नाही. शशांक सिंग, मार्कस स्टॉइनिस, नेहाल वढेरा आणि सूर्यांश शेडगे यांनी अपेक्षेप्रमाणे धावा केल्या नाहीत.






