प्रथमच आयोजित केलेल्या दक्षिण आफ्रिकेतील एसए टी20 लीग या स्पर्धेतील साखळी फेरीचे सामने मंगळवारी (7 फेब्रुवारी) समाप्त झाले. अगदी अखेरच्या षटकापर्यंत रोमांचक झालेल्या या सामन्यात पार्ल रॉयल्स संघाला पराभव पत्करावा लागला असला तरी, त्यांनी उपांत्य फेरीत आपली जागा निश्चित केली. त्यामुळे डर्बन सुपरजायंट्स संघाचे उपांत्य फेरीत पोहोचण्याचे स्वप्न धुळीस मिळाले.
Live to fight another day (tomorrow) 💗😎 pic.twitter.com/FPlVNSjGfv
— Paarl Royals (@paarlroyals) February 7, 2023
प्रिटोरिया येथे झालेल्या या सामन्यात पार्ल संघाला विजय अथवा नजीकच्या फरकाने सामना गमावला तरी चालणारे होते. दुसरीकडे प्रीटोरिया संघ यापूर्वीच उपांत्य फेरीत दाखल झालेला. पार्ल संघाचा कर्णधार डेव्हिड मिलर याने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. कुसल मेंडीस याने अवघ्या 41 चेंडूंवर 80 धावा ठोकत प्रिटोरिया संघाला मोठ्या धावसंख्येच्या दिशेने नेले. अखेरच्या षटकांमध्ये कॉलिन इंग्राम व जिमी निशाम यांनी पार्ल संघाच्या गोलंदाजांवर हल्ला चढवत संघाला 5 बाद 226 अशी मोठी धावसंख्या उभारून दिली.
पार्ल संघाला उपांत्य फेरीत प्रवेश करण्यासाठी या सामन्यात कमीत कमी 163 धावांचा टप्पा पार करणे गरजेचे होते. मात्र, त्यांनी केवळ 38 धावांमध्ये आपले तीन गडी गमावले. मॉर्गनने 12 चेंडूत 24 धावा करत काहीसा वेग वाढवला. मात्र, तो बाद झाल्यानंतर कर्णधार डेव्हिड मिलरही फार काळ टिकू शकला नाही. फेकलुकवायो व जोन्स पाठोपाठ बाद झाल्याने संघाची संपूर्ण जबाबदारी बटलरच्या खांद्यावर होती. 7 बाद 115 धावा झाल्या असताना बटलरने अचानक रौद्ररूप धारण केले.
त्याने इंग्राम व निशाम यांच्या दोनच षटकात 36 धावा वसूल करताना आपल्या संघाला उपांत्य फेरीत पोहोचण्यासाठी आवश्यक असलेल्या 163 पर्यंत नेण्याचा प्रयत्न केला. मात्र, संघाच्या 153 धावा झालेल्या असताना तो 45 चेंडूवर 70 धावांची खेळी करत बाद झाला. नवा फलंदाज युसुफने एक धाव घेतल्यानंतर फॉर्चुने चौकार वसूल करत संघाच्या आशा जिवंत ठेवल्या. विजय दूर असला तरी, उपांत्य फेरी गाठण्यासाठी पार्ल संघाला अखेरच्या षटकात 5 धावांची गरज होती. त्यावेळी पहिल्या चेंडूवर एक व दुसऱ्या चेंडूवर बाईजच्या चार धावा मिळाल्याने पार्ल संघ उपांत्य फेरीत सामील झाला. मात्र, त्यांना हा सामना 59 धावांच्या मोठ्या फरकाने गमवावा लागला.
पार्ल संघाने 163 धावा केल्याने त्यांची धावगती डर्बन सुपरजायंट्स संघापेक्षा सरस झाली. त्यामुळे एमआय केपटाऊन व डर्बन सुपरजायंट्स स्पर्धेतून बाहेर झाले. स्पर्धेतील पहिली उपांत्य लढत पुन्हा एकदा पार्ल रॉयल्स विरूद्ध प्रिटोरिया कॅपिटल्स अशी रंगेल. तर, दुसऱ्या उपांत्य फेरीत जो’ बर्ग सुपर किंग्स व सनरायझर्स ईस्टर्न केप हे संघ भिडताना दिसतील. स्पर्धेचा अंतिम सामना 11 फेब्रुवारी रोजी खेळला जाईल.
(Paarl Royals Qualified For Semi Finals Of SA T20 Buttler Strong Inning Helps)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
‘सूर्यामध्ये मला कपिल देव दिसतात’, माजी प्रशिक्षकाने केली दिलखुलास स्तुती
हरमन-स्मृतीसह ‘या’ 24 जणी उतरणार सर्वोच्च बेस प्राईसने WPL लिलावात, 409 खेळाडूंची अंतिम यादी जाहीर