देशांतर्गत क्रिकेटमधील प्रतिष्ठेची स्पर्धा मानल्या जाणाऱ्या दुलीप ट्रॉफीला 5 सप्टेंबरपासून सुरुवात झाली. यंदा या स्पर्धेत अनेक स्टार भारतीय क्रिकेटपटू सहभागी झाले आहेत.
येत्या 19 सप्टेंबरपासून भारताला बांगलादेशविरुद्ध कसोटी मालिका खेळायची आहे. दुलीप ट्रॉफीमध्ये चांगली कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना या मालिकेत स्थान मिळू शकतं. यापैकी एक नाव आहे बंगालचा वेगवान गोलंदाज आकाश दीप. तो दुलीप ट्रॉफीमध्ये इंडिया ए संघाचा भाग आहे. स्पर्धेच्या पहिल्या सामन्यात त्यानं आपल्या धारदार गोलंदाजीनं भारताच्या कसोटी संघासाठी दावा ठोकलाय.
दुलीप ट्रॉफीचा पहिला सामना इंडिया ए विरुद्ध इंडिया बी यांच्यात झाला. इंडिया बी संघात यशस्वी जयस्वाल, रिषभ पंत, सरफराज खान यांसारख्या अनेक मोठ्या फलंदाजांचा समावेश आहे. मात्र यांच्याविरुद्ध आकाश दीपनं जबरदस्त गोलंदाजी केली. त्यानं पहिल्या डावात 27 षटकात 7 मेडन्ससह 60 धावा दिल्या आणि 4 बळी घेतले. तर दुसऱ्या डावात त्यानं 14 षटकात 7 मेडन्ससह 56 धावा दिल्या आणि 5 बळी घेतले. अशा प्रकारे, त्यानं दोन्ही डावांत एकूण 9 विकेट घेतल्या. त्याच्या घातक गोलंदाजीमुळे इंडिया बी संघाचा दुसरा डाव अवघ्या 184 धावांत आटोपला.
आकाश दीपनं या वर्षी मार्चमध्ये रांची येथे इंग्लंडविरुद्ध खेळलेल्या कसोटी सामन्याद्वारे आपल्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीची सुरुवात केली होती. आता त्यानं बांगलादेशविरुद्ध 19 सप्टेंबरपासून होणाऱ्या दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठीही आपला दावा मांडला आहे. वर्कलोड मॅनेजमेंटमुळे जसप्रीत बुमराहला या मालिकेसाठी विश्रांती मिळू शकते. अशा परिस्थितीत अनुभवी मोहम्मद सिराज आणि मोहम्मद शमी यांच्यासोबत एखाद्या युवा गोलंदाजाचा संघात समावेश केला जाऊ शकतो. या शर्यतीत मुकेश कुमारचं नाव आघाडीवर आहे. मात्र आता आकाश दीपनं आपल्या कामगिरीनं निवडकर्त्यांचं लक्ष वेधून घेतलंय. मीडिया रिपोर्ट्सनुसार, दुलीप ट्रॉफीच्या पहिल्या फेरीनंतर भारताच्या कसोटी संघाची घोषणा केली जाऊ शकते.
हेही वाचा –
दुलीप ट्रॉफीमध्ये खळबळ! युवा यष्टीरक्षकानं केली धोनीच्या 20 वर्ष जुन्या विक्रमाची बरोबरी
राहुलला डच्चू, पंतला संधी? बांगलादेशविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी असा असू शकतो भारतीय संघ
करोडोंमध्ये आहे शुबमन गिलची संपत्ती! क्रिकेटशिवाय अन्यही उत्पन्नाचे स्रोत; वाढदिवशी सर्वकाही जाणून घ्या