---Advertisement---

कर्णधारपदाबरोबर बाबर आझमचा फलंदाजी क्रमांकही गेला, ‘या’ खेळाडूने काबीज केली जागा

On: शुक्रवार, जानेवारी 30, 2026 6:09 PM
---Advertisement---

पाकिस्तान विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात तीन सामन्यांची टी२० मालिका सुरू आहे. यातील पहिला सामना गुरूवारी (२९ जानेवारी) खेळला गेला. लाहोरमध्ये खेळल्या गेलेल्या या सामन्यात पाकिस्तानने २२ धावांनी विजय मिळवला आहे. त्यामुळे ते १-० असे आघाडीवर आहे. यामध्ये पाकिस्तानने आगामी टी२० विश्वचषकासाठी फायद्याचा ठरणारा मोठा निर्णय घेतला असून बाबर आझमला मात्र त्याचा तोटा झाला आहे.

या मालिकेत पाकिस्तानचे नेतृत्व सलमान आगा करत असून तो टी२० विश्वचषक २०२६ मध्येही संघाचे नेतृत्व करणार आहे. त्याचबरोबर विश्वचषकातही तो फलंदाजीसाठी तिसऱ्या स्थानावर येणार असे पाकिस्तानने जाहीर केले आहे. हे पाहता बाबरला मोठे नुकसान झाल्याचे दिसते. त्याला आधी कर्णधारपदावरून काढले असता आता त्याचा फलंदाजी क्रमही गेल्याचे दिसते.

मागील काही काळापासून सलमान हा पाकिस्तानचा महत्वाचा खेळाडू राहिलाआहे. त्याने अनेक सामन्यांमध्ये पाकिस्तानसाठी तिसऱ्या स्थानावर फलंदाजी करत चांगली कामगिरी केली आहे. याचाच प्रत्यय ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यात आला. त्या सामन्यात त्याने तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करताना २७ चेंडूत ३९ धावा केल्या. यामध्ये त्याने ४ षटकार तर एक चौकार मारला.

टी२० विश्वचषकाआधी सलमानची ही कामगिरी संघाच्या हिताची ठरण्याची शक्यता आहे. तसेच तो ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या उर्वरित दोन्ही सामन्यात तिसऱ्या क्रमांकावरच फलंदाजी करणार आहे.

“मी भविष्यात तिसऱ्या क्रमांकावरच फलंदाजी करणार आहे”, असे सलमानने आंतरराष्ट्रीय क्रिकेट संघटनेशी (आयसीसी) बोलताना सांगितले.

“आम्हाला अधिक स्पिनचा सामना करावा लागण्याची आशा आहे आणि मी पॉवरप्लेमध्ये स्पिनला चांगला प्रतिसाद देतो. यामुळेच मी वरच्या फळीत फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे आणि त्यावरच कायम राहणार आहे”, असेही सलमानने पुढे म्हटले आहे. तसेच त्याच्या नेतृत्वात पाकिस्तानने ऑस्ट्रेलियाला टी२० मध्ये २६५० दिवसांनी पराभूत केले आहे.

सलमान आणि पाकिस्तान संघाचा हा ठाम निर्णय पाहता बाबरचा फलंदाजीचा तिसरा क्रमांक कायमचा गेल्याचे समजते. तो ऑस्ट्रेलियाविरुद्ध चौथ्या क्रमांकावर फलंदाजीला आहे. तेव्हा त्याची वाईट कामगिरी सुरूच राहिली. त्याने २० चेंडूत २४ धावा केल्या. ज्यामध्ये एक चौकार आणि एका षटकाराचा समावेश आहे.

तिसऱ्या क्रमांकावर बाबरची कामगिरी पाहिली तर त्याचा विक्रम चांगला आहे. त्याने पाकिस्तानसाठी टी२०मध्ये ४० डावांमध्ये १३७२ धावा केल्या आहेत.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---