पाकिस्तानने घरच्या मैदानावर ऑस्ट्रेलियाला टी२० मालिका खेळण्यासाठी आंमत्रित केले. आगामी टी२० विश्वचषक २०२६च्या पार्श्वभूमीवर दोन्ही संघांसाठी ही मालिका महत्वाची होती. या मालिकेतील तिन्ही सामने जिंकत पाकिस्तानने घरच्या मैदानावर त्यांचे वर्चस्व दाखविले आहे. यातील तिसऱ्या सामन्यात पाकिस्तानचा फलंदाज बाबर आझमने भारताच्या विराट कोहलीचा मोठा विक्रम मागे टाकला आहे.
रविवारी (१ फेब्रुवारी) झालेल्या त्या टी२० सामन्यात बाबरने अर्धशतक केले. हे त्याचे आंतरराष्ट्रीय टी२०मधील ३९वे अर्धशतक ठरले. तर कोहलीने या प्रकारात ३८ अर्धशतके केली आहेत. बाबरने यासाठी १३९ सामने खेळले असून विराटने मात्र १२५ सामन्यातच ३८ अर्धशतके केली होती.
आंतरराष्ट्रीय टी२०मध्ये सर्वाधिक अर्धशतकांची यादी पाहिली तर बाबर आणि विराट नंतर भारताचा माजी कर्णधार रोहित शर्मा तिसऱ्या स्थानावर आहे. त्याने ३२ अर्धशतके केली आहेत. पाकिस्तानचाच मोहमद रिझवान ३० अर्धशतके करत चौथ्या तर ऑस्ट्रेलियाचा डेविड वॉर्नर आणि इंग्लंडचा जोस बटलर प्रत्येकी २८ अर्धशतके करत संयुक्तपणे पाचव्या स्थानावर आहेत.
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तिसऱ्या टी२०मध्ये पाकिस्तानने ६ विकेट्स गमावत २०७ धावसंख्या उभारली होती. ज्यामध्ये लक्ष्याचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाचे फलंदाज खेळपट्टीवर टिकलेच नाही. त्यांनी ९६ धावसंख्येवरच सर्व विकेट्स गमावल्या. त्यामुळे पाकिस्तानने हा सामना १११ धावांनी जिंकला. पाकिस्तानचा टी२० मालिकेतील हा तिसरा व्हाईटवॉश ठरला. ही मालिका जिंकल्याने पाकिस्तानचा आत्मविश्वास नक्कीच दुणावला असेल.
या मालिकेत बाबरने चौथ्या क्रमांकावर फलंदाजी केली. पाकिस्तानचा कर्णधार सलमान आगा टी२० विश्वचषकात तिसऱ्या स्थानावर फलंदाजी करण्याचे निश्चित झाल्याने त्याने या मालिकेतही त्याच क्रमांकावर फलंदाजी केली. ऑस्ट्रेलियाविरुद्ध बाबरने फलंदाजी क्रमांकाबाबत म्हटले, “माझ्यासाठी फलंदाजी क्रमांक महत्वाचा नसून कामगिरी कशी करावी यावर भर असतो.”
पाकिस्तानच्या डावात सईम आयुब यानेही अर्धशतकी खेळी केलीय त्याने ३७ चेंडूत ५६ धावा केल्या. तसेच शादाब खानने १९ चेंडूत ४६ धावा केल्या. या मालिकेत पाकिस्तानचे टी२० विश्वचषक संघातील जवळपास सर्वच खेळाडू खेळले असून गोलंदाजीबरोबर फलंदाजीतही चांगली कामगिरी केली आहे. लक्ष्याचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाचे सात खेळाडू एकेरी धावांवरच बाद झाले, तर सर्वाधिक धावा मार्कस स्टॉइनिसने केल्या. त्याने २२ चेंडूत २३ धावा केल्या.
टी२० आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये कारकिर्दीत सर्वाधिक अर्धशतके-
१) ३९* – बाबर आझम
२) ३८ – विराट कोहली
३) ३२ – रोहित शर्मा
४) ३० – मोहमद रिझवान
५) २८ – डेविड वॉर्नर, जोस बटलर





