ऑस्ट्रेलिया पुरूष संघ सध्या पाकिस्तानच्या दौऱ्यावर आहे. या दौऱ्यानंतर ते थेट टी२० विश्वचषक २०२६साठी भारत-श्रीलंकेत दाखल होणार आहेत. पाकिस्तान दौऱ्यात ते तीन सामन्यांची टी२० मालिका खेळणार असून त्यातील पहिला सामना गुरूवारी (२९ जानेवारी) लाहोरमध्ये खेळला जाणार आहे. या मालिकेत ऑस्ट्रेलियाचे नेतृत्व मिशेल मार्श करणार आहे.
या मालिकेच्या ट्रॉफीचे अनावरण झाले असता त्याचा एक व्हिडिओ समोर आला आहे. त्यामध्ये दोन्ही संघाचे कर्णधार ट्रॉफीसह असून मार्श थोडा गोंधळलेल्या स्थितीत दिसत आहे. त्याच्या या हावभावाचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. त्यावर काहींनी तो घाबरला की काय असा अंदाज व्यक्त केला आहे. तसेच त्याबाबत काहींनी पोस्टही केल्या आहेत.
मार्शच्या त्या स्थितीमागचे कारण म्हणजे जेव्हापासून त्याने पाकिस्तानमध्ये पाऊल ठेवले आहे, तेव्हापासून कॅमेरासह पत्रकार त्याचा पाठलाग करत आहे. ज्यामुळे तो निराश झालेला वाटतो. त्याच कारणामुळे तो ट्रॉफी अनावरणावेळीही इकडे-तिकडे पाहताना दिसत आहे.
टी२० विश्वचषकाच्या पार्श्वभूमीवर दोन्ही संघासाठी सराव म्हणून ही मालिका महत्वाची आहे. या स्पर्धेसाठी दोन्ही देशांनी त्यांचे संघ जाहीर केले आहेत. पाकिस्तान यात खेळणार की नाही हे सरकार ठरवेल, असे वक्तव्य पाकिस्तान क्रिकेट बोर्डचे अध्यक्ष मोहसीन नक्वी यांनी केले होते. ते काहीही बोलू देत पाकिस्तान संघ मात्र या स्पर्धेसाठी सज्ज आहे. त्यासाठी त्यांनी कोलंबोचे तिकीटही बूक केल्याचे कळते.
या मालिकेसाठी ऑस्ट्रेलियाने त्यांच्या संघात अनेक नव्या खेळाडूंना संधी दिली आहे. तसेच पहिल्याच सामन्यात ऑस्ट्रेलियाचे नेतृत्व मार्श नाही तर ट्रेविस हेड करणार आहे. या मालिकेत पाकिस्तानचे कर्णधारपद सलमान आगा भुषविणार आहे.
पाकिस्तान-ऑस्ट्रेलिया यांच्यात दुसरा टी२० सामना ३१ जानेवारी आणि तिसरा सामना १ फेब्रुवारीला खेळला जाणार आहे. हे दोन्ही सामने लाहोरमध्ये खेळले जाणार आहेत. या सामन्यानंतर ते विश्वचषकासाठी रवाना होणार आहेत. यातील पहिलाच सामना पाकिस्तान विरुद्ध नेदरलॅंड्स असा होणार आहे. हा सामना ७ फेब्रुवारीला कोलंबोमध्ये खेळला जाणार आहे.






