आशिया चषक 2022 मधील चौथा सुपर फोर सामना अफगाणिस्तान व पाकिस्तान यांच्या दरम्यान खेळला गेला. या सामन्यात पाकिस्तानने शानदार गोलंदाजी करत अफगाणिस्तानचा डाव 129 धावांवर रोखला. त्यानंतर सुपर फोरमधील अखेरच्या षटकापर्यंत रंगलेल्या या दुसऱ्या सामन्यात पाकिस्तानने एक गडी राखून विजय आपल्या नावे केला. युवा वेगवान गोलंदाज नसीम शाह याने बॅटने करामत दाखवत अखेरचा षटकात दोन षटकार खेचत संघाला विजय मिळवून दिला.
UNBELIEVABLE FINISH! 🤩
Pakistan are through to the Asia Cup final💪#AsiaCup2022 | #AFGvPAK pic.twitter.com/T2KGjTmo5k
— Pakistan Cricket (@TheRealPCB) September 7, 2022
शारजा येथे खेळल्या गेलेल्या या सामन्यात अफगाणिस्तानला प्रथम फलंदाजीचे निमंत्रण मिळाले. त्यांच्या सलामीवीरांनी चांगली सुरुवात केली मात्र त्यांना मोठी खेळी करण्यात यश आले नाही. अफगाणिस्तानचा कर्णधार मोहम्मद नबी वगळता प्रत्येक फलंदाजाने 10 ते 20 भावांच्या दरम्यान योगदान दिले. तिसऱ्या क्रमांकावरील इब्राहिम झादरानने सर्वाधिक 35 धावा केल्या. पाकिस्तानसाठी प्रत्येक गोलंदाजाने बळी आपल्या नावे केला. रऊफने दोन बळी मिळवले. अफगाणिस्ताने निर्धारित 20 षटकात 129 धावा केल्या.
प्रत्युत्तरात, पाकिस्तानला दुसऱ्याच चेंडूवर धक्का बसला व बाबर आझम खातेही न खोलता माघारी परतला. फखर झमान हा देखील धावबाद झाला. नुकताच टी20 क्रमवारी पहिल्या स्थानी पोहोचलेला मोहम्मद रिजवान 20 धावा करू शकला. मधल्या फळीतील इतर फलंदाज बाद असताना आसिफ अली याने पाकिस्तानला सामन्यात जिवंत ठेवले. मात्र, 19 व्या षटकात बाद झाला. विजयासाठी अखेरच्या षटकात 11 धावांची गरज असताना अखेरचा फलंदाज नसीम शहा याने सलग दोन षटकार खेचत पाकिस्तानला विजय मिळवून दिला.
या विजयासह पाकिस्तानने आशिया चषक 2022 च्या अंतिम फेरीत प्रवेश केला. तर भारत व अफगाणिस्तान यांना स्पर्धेतून बाहेर व्हावे लागले. यापूर्वी दोन विजय मिळवत श्रीलंका संघाने अंतिम फेरीत आपली जागा पक्की केली आहे.