---Advertisement---

टी२० विश्वचषक: नामिबियाला नमवत पाकिस्तानने ९ वर्षांनी मारली उपांत्य फेरीत धडक

On: बुधवार, नोव्हेंबर 3, 2021 2:23 AM
---Advertisement---

टी-२० विश्वचषक २०२१ स्पर्धेत मंगळवारी पाकिस्तान आणि नामिबिया या दोन संघांमध्ये स्पर्धेतील ३१ वा सामना खेळला गेला. पाकिस्तानने या सामन्यात ४५ धावांनी विजय मिळवला. पाकिस्तानचा हा विश्वचषकातील सलग चौथा विजय असून त्यांनी उपांत्य फेरीतील स्थान पक्के केले आहे. पाकिस्तान या स्पर्धेत उपांत्य फेरी गाठणारा पहिला संघ बनला आहे. तसेच तब्बल ९ वर्षांनंतर पाकिस्तानने कोणत्याही विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत धडक मारली आहे.

हा सामना आबु धाबी स्थित शेख झायेद स्टेडियमवर आयोजित केला गेला होता. सामन्यात पाकिस्तानने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पाकिस्तानने प्रथम फलंदाजी करण्याचा घेतलेला हा निर्णय मोठी धावसंख्या करून योग्य ठरवला. प्रथम फलंदाजी करताना पाकिस्तानने २० षटकात अवघ्या दोन विकेट्स गमावल्या आणि १८९ धावांची मोठी धावसंख्या उभारली.

पाकिस्तानच्या या धावसंख्येमध्ये सलामीवीर मोहम्मद रिझवानने ५० चेंडूत सर्वाधिक ७९ धावा केल्या. रिजवानने या धावा ८ चौकार आणि ४ षटकारांच्या मदतीने केल्या आहेत. कर्णधार आणि सलामीवीर बाबर आजमनेही या सामन्यात ४९ चेंडूत ७० धावांची मोठी आणि नाबाद खेळी केली. यामध्ये त्याच्या सात चौकारांचा समावेश आहे.  याव्यतिरिक्त मोहम्मद हाफिजनेही १६ चेंडूत ५ चौकरांच्या मदतीने ३२ धावांची नाबाद खेळी केली.

पाकिस्तानने दिलेल्या १९० धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेल्या नामिबिया संघाने २० षटके खेळून काढली, पण त्यांना लक्ष्य गाठता आले नाही. नामिबियाने २० षटकांमध्ये पाच विकेट्स गमावल्या आणि १४४ धावा केल्या. परिणामी नामिबियाला सामन्यात तब्बल ४५ धावांनी पराभव मिळाला.

नामिबियाच्या डावात डेविड विजेने ३१ चेंडूत तीन चौकार आणि दोन षटकारांच्या मदतीने सर्वाधिक ४३ धावा केल्या. याव्यतिरिक्त क्रेग विलियम्सनने ३७ चेंडूत पाच चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने ४० धावा केल्या. तसेच त्यांचा सलामीवीर स्टिफन बार्डनेही २९ चेंडूत २९ धावा केल्या. यामध्ये बार्डच्या एक चौकार आणि एक षटकाराचा समावेश आहे.

गोलंदाजांमध्ये नामिबियासाठी डेविड विजे आणि जान फ्रायलिंकने प्रत्येकी एक विकेट घेतली. पाकिस्तानसाठी ईमाद वसीन, हसन अली, हॉरिस रौफ आणि शाबाद खान यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली. सामना संपल्यानंतर पाकिस्तानच्या मोहम्मद रिझवानला त्याने केलेल्या उत्कृष्ट प्रदर्शनासाठी सामनावीर निवडले गेले.

महत्त्वाच्या बातम्या – 

जोडी नंबर १! रोहित-शिखरच्या जोडीला भारी ठरली आझम-रिझवानची जोडी, ‘या’ यादीत मिळवले अव्वल स्थान

‘ब्रेकअप झालाय का?’ शुबमन गिलच्या ‘या’ पोस्टमुळे चर्चेला उधाण

टी२०मध्ये बाबर आझम ‘कर्णधार’ विराट कोहलीला ठरतोय सरस, आता ‘या’ विक्रमात दिला धोबीपछाड

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---