पाकिस्तानचा माजी कर्णधार वसीम अक्रम यानं भारतीय संघाबाबत एक मोठं वक्तव्य केलं आहे. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील कसोटी मालिका टर्निंग विकेटवर खेळली गेली, तर पाकिस्तान भारतीय संघाला पराभूत करू शकतो, असे तो म्हणाला. ऑस्ट्रेलिया आणि पाकिस्तान यांच्यातील पहिल्या एकदिवसीय सामन्यात समालोचन करताना या 58 वर्षीय माजी वेगवान गोलंदाजानं हा दावा केला.
सध्या पाकिस्तानचा संघ ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर आहे. येथे उभय संघांमध्ये तीन सामन्यांची वनडे मालिका खेळली जात आहे. पहिल्या एकदिवसीय सामन्यादरम्यान वसीम अक्रम आणि इंग्लंडचा माजी कर्णधार मायकेल वॉन कॉमेंट्री करत होते. या दरम्यान वॉननं अक्रमला प्रश्न करताना गंमतीनं म्हटलं की, मला भारत आणि पाकिस्तान यांच्यात कसोटी मालिका बघायची आहे.
यावर उत्तर देताना अक्रम म्हणाला, “ही खूप मोठी गोष्ट असेल. हे दोन क्रिकेटवेड्या देशांसाठी आणि खेळासाठी खूप चांगलं असेल.” दरम्यान, अक्रम पुढे बोलताना म्हणाला, “आता पाकिस्तान टर्निंग पिचवर भारताला पराभूत करू शकतो. त्यांना नुकतेच न्यूझीलंडनं घरच्या मैदानावर 3-0 ने पराभूत केलं.”
भारतीय संघाला गेल्या 24 वर्षांत घरच्या मैदानावर प्रथमच व्हाईटवॉश चा सामना करावा लागला आहे. न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेदरम्यान भारतीय फलंदाज फिरकीपटूंसमोर पूर्णपणे असहाय दिसले. किवी फिरकीपटू एजाज पटेल आणि मिचेल सॅन्टनर यांच्यापुढे भारतीय फलंदाजांनी अक्षरश: गुडघे टेकले.
याउलट, अलीकडेच पाकिस्ताननं आपल्या मायदेशात फिरकी गोलंदाजांच्या जोरावर इंग्लंडविरुद्ध 2-1 असा ऐतिहासिक विजय मिळवला. विशेष म्हणजे, पाकिस्ताननं पहिल्या कसोटीत पराभव झाल्यानंतर सलग दोन सामने जिंकून कमबॅक केला होता. कदाचित त्यामुळेच वसीम अक्रमला वाटत असेल की, आपला संघ फिरकी विकेट्सवर टीम इंडियाला हरवू शकतो.
हेही वाचा –
पाकिस्तानी खेळाडूची मैदानावर विचित्र कृती, पॅट कमिन्सला हसू आवरेना; VIDEO पाहा
मिचेल स्टार्कनं मोडला महान ब्रेट लीचा मोठा रेकॉर्ड! अशी कामगिरी करणारा पहिलाच गोलंदाज
कोच गौतम गंभीरवरील दबाव वाढला, बॉर्डर-गावस्कर मालिका ‘करो या मरो’!