आगामी आयसीसी टी20 विश्वचषकापूर्वी पाकिस्तान क्रिकेटमध्ये मोठा बदल पाहायला मिळाला आहे. पाकिस्तान क्रिकेट बोर्डानं गॅरी कर्स्टन यांची व्हाईट बॉल फॉरमॅटसाठी (एकदिवसीय आणि टी20) पाकिस्तान संघाचे नवे प्रशिक्षक म्हणून नियुक्ती केली आहे. तुम्हाला आठवत असेल, कर्स्टन यांच्या प्रशिक्षणाखालीच भारतीय संघानं 2011 चा क्रिकेट विश्वचषक जिंकला होता.
याशिवाय पाकिस्तान क्रिकेट बोर्डानं ऑस्ट्रेलियाचा अनुभवी जेसन गिलेस्पी याला कसोटी संघाचा मुख्य प्रशिक्षक बनवलंय. तर माजी पाकिस्तानी क्रिकेटपटू अझहर महमूद याला तिन्ही फॉरमॅटमध्ये संघाचा सहाय्यक प्रशिक्षक बनवण्यात आलंय. या तिन्ही प्रशिक्षकांचा कार्यकाळ प्रत्येकी दोन वर्षांचा असेल.
56 वर्षीय गॅरी कर्स्टन सध्या आयपीएल फ्रँचायझी गुजरात टायटन्सचे मेंटर आहेत. भारताव्यतिरिक्त कर्स्टन हे तीन वर्ष दक्षिण आफ्रिकेच्या संघाचेही मुख्य प्रशिक्षक होते. अमेरिका आणि वेस्ट इंडिजमध्ये होणाऱ्या टी20 विश्वचषकाच्या एक महिना आधी कर्स्टन यांची पाकिस्तानच्या प्रशिक्षकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. मिकी आर्थर यांच्या जाण्यानंतर पाकिस्तान संघाचं मुख्य प्रशिक्षकपद रिक्त होतं. आर्थर यांच्यानंतर मोहम्मद हाफीझनं संचालक म्हणून संघाची जबाबदारी स्वीकारली होती. परंतु न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यात खराब कामगिरी केल्यानंतर त्यालाही काढून टाकण्यात आलं.
गॅरी कर्स्टन यांची आंतरराष्ट्रीय कारकीर्द
डावखुरे सलामीवीर गॅरी कर्स्टन यांनी दक्षिण आफ्रिकेसाठी 101 कसोटी सामने खेळले आहेत. यामध्ये त्यांनी 45.27 च्या सरासरीनं 7289 धावा केल्या आहेत. या कालावधीत 275 ही त्यांची सर्वोच्च धावसंख्या होती. गॅरी यांनी आपल्या कसोटी कारकिर्दीत 21 शतकं आणि 34 अर्धशतकं झळकावली आहेत. याशिवाय गॅरी कर्स्टन यांनी 185 एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत, ज्यामध्ये त्यांच्या नावे 6798 धावा आहेत. यामध्ये 13 शतकं आणि 45 अर्धशतकांचा समावेश आहे. नाबाद 188 ही गॅरी कर्स्टन यांची एकदिवसीय आंतरराष्ट्रीय मधील सर्वोत्तम धावसंख्या होती, जी त्यांनी 1999 च्या विश्वचषकात यूएई विरुद्ध केली होती.
महत्त्वाच्या बातम्या –
“आता 250 धावांचा बचाव करणंही अवघड”, रिषभ पंतनंही केले ‘इम्पॅक्ट खेळाडू’ नियमावर प्रश्नचिन्ह उपस्थित
लखनऊला हरवून राजस्थान रॉयल्स प्लेऑफमध्ये दाखल, संजू सॅमसन-ध्रुव जुरेलची अर्धशतकं
दिल्ली कॅपिटल्सचा दणदणीत विजय, घरच्या मैदानावर दिला मुंबई इंडियन्सला धोबीपछाड