टी20 विश्वचषक 2024 मध्ये पाकिस्तान संघाची कामगिरी काही विशेष राहिली नाही. संघ साखळी फेरीतूनच बाद झाला. पाकिस्तानला पहिल्या सामन्यात अमेरिकेविरुद्ध सुपर ओव्हरमध्ये पराभव स्वीकारावा लागला. त्यानंतर टीम इंडियानं त्यांचा 6 धावांनी पराभव केला. जरी पाकिस्ताननं तिसऱ्या सामन्यात कॅनडाचा 7 गडी राखून पराभव केला, तरी अमेरिका आणि आयर्लंड यांच्यातील सामना पावसामुळे वाहून गेल्यानं त्यांचं स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आलं.
संघाच्या या खराब कामगिरीनंतर पाकिस्तान क्रिकेट बोर्ड (PCB) आता कठोर पावलं उचलणार आहे. पीसीबी खेळाडूंच्या पगारात कपात करू शकते. बोर्डाच्या विश्वसनीय सूत्रांनी पीटीआय या वृत्तसंस्थेला सांगितलं की, काही अधिकारी आणि माजी खेळाडूंनी पीसीबीचे अध्यक्ष मोहसिन नक्वी यांना केंद्रीय कराराचं पुनरावलोकन करण्याचा सल्ला दिला आहे.
सूत्रांनी सांगितलं की, “पीसीबी अध्यक्षांनी संघाच्या खराब कामगिरीवर कठोर भूमिका घेतल्यास खेळाडूंच्या केंद्रीय कराराचा आढावा घेतला जाऊ शकतो आणि त्यांच्या वेतनात कपात केली जाऊ शकते.” टी20 विश्वचषकातून पाकिस्तानचा संघ लवकर बाहेर पडण्यामागे संघातील गटबाजी आणि महत्त्वाच्या क्षणी वरिष्ठ खेळाडूंची खराब कामगिरी जबाबदार असल्याचं बोललं जात आहे.
स्टार गोलंदाज शाहीन शाह आफ्रिदी कर्णधारपद गमावल्यानं नाराज आहे. तर मोहम्मद रिझवानही कर्णधारपदासाठी विचार न केल्यानं नाराज आहे. सूत्रांनी सांगितलं की, पाकिस्तान संघात तीन गट पडले आहेत. एका कॅम्पचं नेतृत्व बाबर आझम, दुसऱ्या कॅम्पचं नेतृत्व शाहीन आणि तिसऱ्या कॅम्पचं नेतृत्व रिजवान करत आहे. या सगळ्यात मोहम्मद आमिर आणि इमाद वसीम सारखे वरिष्ठ खेळाडू परतल्यानं संघाची स्थिती बिकट झाली आहे.
बाबर आझम, शाहीन आफ्रिदी आणि मोहम्मद रिझवान हे पीसीबीच्या केंद्रीय कराराच्या श्रेणी-ए मध्ये आहेत. मीडिया रिपोर्ट्सनुसार, प्रत्येकाचा मासिक पगार 13.53 लाख रुपये आहे. ग्रेड-बीमध्ये शादाब खान, फखर जमान, हारिस रौफ आणि नसीम शाह या खेळाडूंचा समावेश आहे, जे दरमहा सुमारे 9 लाख रुपये कमवतात.
सी आणि डी श्रेणीतील खेळाडूंचं मासिक वेतन 2.25 ते 4.5 लाख रुपये आहे. इमाद वसीमला सी ग्रेडमध्ये, तर इफ्तिखार अहमद, हसन अली आणि सॅम अयुब यांना डी ग्रेडमध्ये स्थान देण्यात आलंय. याशिवाय खेळाडूंना आंतरराष्ट्रीय सामने खेळण्यासाठी निश्चित मॅच फी देखील मिळते.
महत्त्वाच्या बातम्या –
या ‘तीन’ पाकिस्तानी क्रिकेटपटूंची कारकीर्द संपली! यापुढे संघात स्थान मिळणे कठीण
टी20 विश्वचषकादरम्यान दिग्गज खेळाडूनं घेतली निवृत्ती, दोन देशांकडून खेळला आहे आंतरराष्ट्रीय क्रिकेट
नामिबियाला हरवूनही इंग्लंडच्या डोक्यावर टांगती तलवार, आता फक्त ऑस्ट्रेलियाच वाचवू शकते