पाकिस्ताननं नुकताच घरच्या मैदानावरील कसोटी मालिकेत इंग्लंडचा पराभव केला. यानंतर मोहम्मद रिझवानची मर्यादित षटकांचा नवा कर्णधार म्हणून नियुक्ती करण्यात आली. यामुळे आता पाकिस्तान क्रिकेटची बिघडलेली गाडी पुन्हा रुळावर आली, असं बोललं जातंय. मात्र या गोष्टींना 24 तासही उलटले नाहीत तर आणखी एक मोठी बातमी समोर येत आहे.
वास्तविक, पाकिस्तानच्या वनडे आणि टी20 संघाचे मुख्य प्रशिक्षक गॅरी कर्स्टन आपलं पद सोडण्याच्या तयारीत असल्याची माहिती मिळत आहे. याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही, मात्र कर्स्टन पाकिस्तान संघासोबत ऑस्ट्रेलिया आणि झिम्बाब्वे दौऱ्यावर जाणार नसल्याचं समजतं.
‘क्रिकबझ’नं आपल्या अहवालात दावा केला आहे की, गॅरी कर्स्टन आणि पाकिस्तानी खेळाडूंचे विचार एकमेकांशी जुळत नाहीत. कर्स्टन यांनी डेव्हिड रीड यांची हाय परफॉर्मन्स कोच म्हणून नियुक्ती करण्याची विनंती केली होती, परंतु पीसीबीनं ते मान्य केलं नाही. यामुळे तणाव वाढला. त्यानंतर बोर्डानं कथितरित्या पर्याय प्रस्तावित केला, जो कर्स्टननं स्वीकारला नाही.
गॅरी कर्स्टन यांनी पाकिस्तानची साथ सोडण्याच्या निर्णयाला अद्याप दुजोरा दिलेला नाही, मात्र सध्याची परिस्थिती पाहता लवकरच याबाबत अधिकृत घोषणा होण्याची शक्यता आहे. कर्स्टन यांनी यावर्षीच व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये पाकिस्तान संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदाची जबाबदारी स्वीकारली होती. त्यांच्या कार्यकाळाला अवघे चार महिने उलटले आहेत. चॅम्पियन्स ट्रॉफीला चार महिन्यांहून कमी कालावधी शिल्लक आहे. अशा परिस्थितीत आता पीसीबीला नवीन प्रशिक्षकाचा शोध घ्यावा लागेल.
नव्या प्रशिक्षकाची घोषणा तातडीनं होण्याची शक्यता आहे. पीसीबीसमोरील पर्यायांपैकी जेसन गिलेस्पी हे रेड बॉल क्रिकेटमध्ये मुख्य प्रशिक्षक आहे. दुसरा पर्याय आकिब जावेदचा आहे. पाकिस्तानचे राष्ट्रीय निवडकर्ते असलेले आकिब यांना नुकत्याच संपलेल्या इंग्लंडविरुद्धच्या तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेत पाकिस्तानचं पुनरागमन करण्याचं श्रेय जातं. त्यांनी या मालिकेत बाबर आझम आणि शाहीन आफ्रिदी सारख्या स्टार खेळाडूंना बाहेर करण्याचा निर्णय घेतला होता. यानंतर पाकिस्ताननं ही मालिका 2-1 अशी जिंकली.
हेही वाचा –
जर टीम इंडिया बाहेर पडली तर कोणते दोन संघ WTC फायनल खेळतील? हे आहेत दावेदार
इमर्जिंग आशिया कपला मिळाला नवा चॅम्पियन, फायनलमध्ये श्रीलंकेचा पराभव
‘भारताला चेतेश्वर पुजाराची उणीव भासेल’, ऑस्ट्रेलिया दौऱ्यापूर्वी माजी मुख्य निवडकर्त्याचे विधान