मुंबई । पाकिस्तानचा माजी सलामीचा फलंदाज तौफिक उमर यांनी कोरोनावर यशस्वीपणे मात केली आहे. कोरोना मुक्त झालेल्या उमर यांनी लोकांना या आजाराबद्दल गांभीर्य बाळगण्याचे व रोगप्रतिकारक क्षमता वाढविण्याचे आवाहन केले.
राष्ट्रीय ज्युनिअर निवड समितीचे सदस्य असलेले उमर यांना दोन आठवड्यांपूर्वी कोरोना व्हायरसने घेरले होते. त्यामुळे ते घरातच चौदा दिवस क्वारंटाइनमध्ये होते. शुक्रवारी 14 दिवसांनंतर त्यांचे दोन्ही कोरोना अहवाल निगेटिव्ह आले असून आता त्यांची प्रकृती ठणठणीत झाली आहे. 38 वर्षीय उमरने पाकिस्तानकडून 44 कसोटी आणि 22 एकदिवसीय सामने खेळले आहेत.
कोरोना आजारातून बरे झाल्यानंतर उमर म्हणाले की, “प्रत्येकाने स्वतःची काळजी घ्यावी. कोरोना बद्दल लोकांनी गांभीर्य ओळखले पाहिजे. लोकांनी कोरोनाला घाबरून न जाता सोशल डिस्टन्ससिंग यावर योग्य उपाय आहे. अल्लाच्या कृपेमुळे मी बरा झालो.”
पाकिस्तानात कोरोना या विषाणूची लागण झाल्याने मृत्यू दरात दिवसेंदिवस वाढ होत आहे. एप्रिल महिन्यात जफर सर्फराज यांचा कोरोनाची लागण झाल्याने मृत्यू झाला होता. तर मागील आठवड्यात लेगस्पिनर रियाज शेख यांनाही कोरोनाची बाधा झाल्याने जीव गमवावा लागला. या दोघांच्या मृत्यूनंतर क्रीडाविश्वात हळहळ व्यक्त केली.