वर्ल्ड चॅम्पियन्स ऑफ लेजेंड्स 2024 च्या 8 व्या सामन्यात पाकिस्ताननं भारताचा पराभव केला. पाकिस्तान चॅम्पियन्सनं हा सामना 68 धावांनी जिंकला. सुरेश रैनाच्या अर्धशतकानंतरही हरभजन सिंगच्या नेतृत्वाखाली भारत चॅम्पियन संघाचा पराभव झाला. पाकिस्तानसाठी शर्जील खान आणि कामरान अकमल यांनी स्फोटक कामगिरी केली. या दोघांसह शोएब मकसूदनंही अर्धशतक झळकावलं. भारताकडून धवल कुलकर्णी, आरपी सिंह आणि पवन नेगी यांनी प्रत्येकी 1 बळी घेतला.
प्रथम फलंदाजी करताना युनूस खानच्या नेतृत्वाखालील पाकिस्तान संघानं 20 षटकांत 4 गडी गमावून 243 धावा केल्या. या सामन्यात कामरान अकमल आणि शरजील सलामीला आले होते. अकमलनं 40 चेंडूत 77 धावा केल्या. त्यानं आपल्या खेळीत 9 चौकार आणि 4 षटकार मारले. तर शर्जीलनं 72 धावांची खेळी केली. यानंतर मकसूदनं 51 धावा केल्या. शोएब मलिकनंही 18 चेंडूत 25 धावा केल्या.
या सामन्यात भारतीय गोलंदाजांना विशेष कामगिरी करता आली नाही. संघासाठी आरपी सिंहनं 4 षटके टाकली आणि 38 धावा देऊन 1 बळी घेतला. अनुरीत सिंगनं 4 षटकात 45 धावा दिल्या आणि 1 बळी घेतला. धवल कुलकर्णीनं 4 षटकात 49 धावा देत 1 बळी घेतला. पवन नेगीला एक विकेट मिळाली. कर्णधार हरभजन सिंगला एकही बळी मिळाला नाही.
पाकिस्ताननं दिलेल्या 244 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारतीय संघ 20 षटकांत 9 गडी गमावून 175 धावाच करू शकला. टीम इंडियासाठी रॉबिन उथप्पा आणि अंबाती रायडू सलामीला आले. रायुडूनं 23 चेंडूत 39 धावा केल्या. उथप्पानं 12 चेंडूत 22 धावा ठोकल्या. सुरेश रैनानं अर्धशतक झळकावलं. त्यानं 40 चेंडूत 52 धावा केल्या. आपल्या या खेळीत रैनानं 6 चौकार आणि 2 षटकार मारले. युसूफ पठाण शून्यावर बाद झाला. युवराज सिंगनं 14 धावांची खेळी केली. इरफान पठाण 15 धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला. अनुरीत सिंग 20 धावा करून नाबाद राहिला. भज्जी 1 धाव करून बाद झाला.
पाकिस्तानकडून शोएब मलिक आणि वहाब रियाझनं 3-3 बळी घेतले. रियाझनं 3 षटकात 22 धावा दिल्या. मलिकनं 4 षटकात 38 धावा दिल्या. सोहेल खान आणि सोहेल तनवीर यांना प्रत्येकी एक विकेट मिळाली. शाहिद आफ्रिदीला एकही यश मिळालं नाही.
महत्त्वाच्या बातम्या –
हा पराभव टीम इंडिया कधीच विसरणार नाही, झिम्बाब्वेविरुद्ध भारतीय संघाच्या नावे अनेक लाजिरवाणे विक्रम
भारतीय संघाची नाचक्की! दुबळ्या झिम्बाब्वेविरुद्ध लाजिरवाणा पराभव
भारत-पाकिस्तान सामन्याची क्रेझ! अवघ्या काही क्षणांत अख्खं स्टेडियम हाऊसफुल्ल