पाकिस्तानला नुकत्याच घरच्या मैदानावर झालेल्या दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेत बांगलादेशकडून दारूण पराभव पत्करावा लागला. बांगलादेशनं प्रथमच पाकिस्तानविरुद्ध कसोटी मालिका जिंकली आहे.
बांगलादेशनंतर आता पाकिस्तानला घरच्या मैदानावर इंग्लंडविरुद्ध तीन सामन्यांची कसोटी मालिका खेळायची आहे. ही मालिका 7 ऑक्टोबर ते 28 ऑक्टोबर दरम्यान खेळली जाईल. मात्र या मालिकेसंदर्भात आता एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. पाकिस्तान-इंग्लंड मालिकेवर टांगती तलवार असून, दोन्ही संघांना सर्व सामने परदेशात खेळावे लागतील.
वास्तविक, आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 च्या पार्श्वभूमीवर पाकिस्तानमध्ये सध्या अनेक स्टेडियम्सचं अपग्रेडेशन चालू आहे. पुढील वर्षी फेब्रुवारी आणि मार्चमध्ये होणाऱ्या चॅम्पियन्स ट्रॉफीचं आयोजन पाकिस्तान करत आहे. पाकिस्तान विरुद्ध इंग्लंड मालिकेतील सामने मुलतान, कराची आणि रावळपिंडी येथे खेळले जातील. मात्र सध्या तेथे बांधकाम चालू आहे.
‘एक्स्प्रेस ट्रिब्यून’च्या वृत्तानुसार, पाकिस्तान क्रिकेट बोर्ड (PCB) स्टेडियममधील काम पाहता पाकिस्तान-इंग्लंड मालिका देशाबाहेर हलवू शकते. मात्र, पीसीबी सध्या संभ्रमात असून बोर्डानं अद्याप कोणताही निर्णय घेतलेला नाही. रिपोर्टनुसार, जर पीसीबीनं पाकिस्तान-इंग्लंड मालिका हलवण्याचा निर्णय घेतला, तर कसोटी सामने संयुक्त अरब अमिराती (यूएई) किंवा श्रीलंकेत आयोजित केले जाऊ शकतात.
बांगलादेश मालिकेपूर्वीही पाकिस्तानात गोंधळ पाहायला मिळाला होता. पीसीबीनं बांगलादेशविरुद्धचा पहिला कसोटी सामना रावळपिंडीत आणि दुसरा कसोटी सामना कराचीत खेळण्याचा निर्णय घेतला होता. परंतु बोर्डानं मालिका सुरू होण्याच्या तीन दिवस आधी कराची कसोटी रावळपिंडीला हलवली. नूतनीकरणाच्या कामामुळे हा निर्णय घेण्यात आला होता. पीसीबीनं अचानक घेतलेल्या या निर्णयावर जोरदार टीका झाली होती.
हेही वाचा –
भारतीय वंशाच्या स्टार क्रिकेटपटूची प्रकृती बिघडली, हॉस्पिटलमध्ये लढतोय आयुष्याची लढाई
असं करणं अशक्यच! शुभमन गिलनं मागे धावत जाऊन घेतला अविश्वसनीय झेल, VIDEO एकदा पाहाच
जोस बटलर दुखापतीमुळे बाहेर, इंग्लंडला मिळाला नवा टी20 कर्णधार