भारत आणि पाकिस्तान हे दोन देश एकमेकांचे शेजारी असले तरी, दोघांमधील राजकीय वैर व सीमावाद हे प्रश्न सर्व जगाला माहीत आहेत. या वादामुळे उभय देशांमधील क्रीडा संबंध देखील पूर्वीसारखे राहिले नाहीत. याचा सर्वाधिक फटका क्रिकेट आणि क्रिकेट संबंधित इतर बाबींवर होतो. भारत-पाकिस्तानमधील याच तणावामुळे भारतीय प्रसारण वाहिन्यांना पाकिस्तानमधील सामन्यांचे थेट प्रक्षेपण करण्यावर अडचणी येत आहेत.
काय आहे प्रकरण?
जुलै महिन्यात पाकिस्तानचा क्रिकेट संघ इंग्लंडच्या दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्यात ते तीन वनडे व तीन टी२० सामने खेळतील. या मालिकेसाठी प्रसारणाचे हक्क भारतीय वाहिन्या स्टार स्पोर्ट्स किंवा सोनी यांना देण्यात यावे, असा प्रस्ताव पाकिस्तानमधील प्रमुख प्रसारण वाहिनी पाकिस्तान टेलिव्हिजन यांनी ठेवला होता.
मात्र, पाकिस्तान सरकारमधील सूचना व प्रसारण मंत्री फवाद चौधरी यांनी हा प्रस्ताव धुडकावून लावला. फवाद म्हणाले, “पी टिव्हीने भारतीय कंपन्यांना प्रसारण हक्क देण्याचा ठेवलेला प्रस्ताव आम्ही अमान्य करत आहोत. इम्रान खान सरकारने यापूर्वीच सांगितले आहे की, ५ ऑगस्ट २०१९ रोजी जम्मू-काश्मीरमधून हटवलेल्या कलम ३७० निर्णयाचा फेरविचार झाल्यानंतरच उभय देशातील संबंध पूर्ववत होतील.”
भारतीय वाहिन्यांची एकाधिकारशाही
फवाद चौधरी यांनी आपली बाब पुढे नेताना म्हटले, “दक्षिण आशियातील सर्व क्रिकेट प्रक्षेपणावर स्टार व सोनी यांची मक्तेदारी आहे. भारतीय कंपनीशी करार नसल्यास ही मालिका पाकिस्तानमध्ये प्रसारित होणार नाही. इंग्लंड अँड वेल्स क्रिकेट बोर्ड व इतर परदेशी कंपन्यांकडून प्रसारण हक्क मिळवून सरकार मधला मार्ग शोधण्याचा प्रयत्न करीत आहे.”
भारत, दक्षिण आफ्रिका, न्यूझीलंड आणि बांगलादेशमधील सर्व सामन्यांचे प्रक्षेपण हे स्टार तर वेस्ट इंडीज, ऑस्ट्रेलिया, इंग्लंड व श्रीलंकेतील सामन्यांचे प्रक्षेपण सोनी या वाहिनीकडून केले जाते.
भारत आणि पाकिस्तानमध्ये होत नाही द्विपक्षीय मालिका
भारत आणि पाकिस्तान या देशातील राजकीय तणावामुळे दोन्ही देशातील क्रिकेट संघांमध्ये द्विपक्षीय मालिका खेळवल्या जात नाहीत. भारताने अखेरच्या वेळी पाकिस्तानचा दौरा २००६ मध्ये केलेला. तर, पाकिस्तान संघ २०१३ मध्ये शेवटचा भारतात खेळण्यासाठी आलेला. मात्र, आयसीसीच्या सर्व स्पर्धांमध्ये हे संघ एकमेकांसमोर उभे ठाकतात.
महत्त्वाच्या बातम्या –
सुनील छेत्रीने मेस्सीला टाकले मागे; ‘या’ यादीत रोनाल्डोपाठोपाठ मिळवला दुसरा क्रमांक