ऑस्ट्रेलियात सुरू असलेल्या टी20 विश्वचषकात (2022 T20 World Cup) रविवारी (30 ऑक्टोबर) तीन सामने खेळले जातील. यातील दुसरा सामना पाकिस्तान विरुद्ध नेदरलँड्स (PAKvNED) यांच्या दरम्यान होईल. अद्याप दोन्ही संघांनी स्पर्धेत एकही विजय मिळवलेला नाही. सामन्याच्या पूर्वसंध्येला नेदरलँड्सच्या प्रशिक्षकांनी असे एक विधान केले आहे, ज्यामुळे क्रिकेटविश्व ढवळून निघाले.
ब गटातील हा सामना पर्थ येथे खेळला जाईल. नेदरलँड्स व पाकिस्तान हे दोन्ही संघ स्पर्धेत अद्याप एकही विजय मिळवू शकले नाहीत. पाकिस्तानला भारत व झिम्बाब्वेने तर नेदरलँड्सला बांगलादेश आणि भारताने पराभूत केले आहे. सामन्याच्या पूर्वसंध्येला झालेल्या पत्रकार परिषदेत बोलताना नेदरलँड्सचे मुख्य प्रशिक्षक रेयान कूक यांनी मोठे वक्तव्य केले. कूक म्हणाले,
“मला वाटतं की प्रत्येक संघाला तो खेळतो तो सामना जिंकायचा असतो. पाकिस्तानचा संघ पराभूत करण्यायोग्य आहे हे आम्ही पाहिलं आहे.”
कूक पुढे म्हणाले, “नुकतेच आम्ही त्यांच्या विरोधात वनडे मालिका खेळलेली. आम्ही विजयाच्या अगदी जवळ आलेलो. यावेळी आम्ही विजयी रेषा पार करू. हे नक्कीच शानदार असेल.”
जुलै महिन्यात नेदरलँड्स दौऱ्यावर झालेल्या वनडे मालिकेतील दोन सामन्यात नेदरलँड्सने पाकिस्तानला विजयासाठी चांगलेच झुंजवले होते. तसेच झिम्बाब्वेसारख्या पात्रता फेरीतून पुढे आलेल्या संघाने पाकिस्तानला पराभूत केल्याने नेदरलँड्सचा आत्मविश्वास दुणावला आहे.
नेदरलँड्स संघ-
स्कॉट एडवर्ड्स (कर्णधार), कॉलिन अकरमन, विक्रम सिंग, शरीझ अहमद, टॉम कूपर, बास डी लीड, ब्रँडन ग्लोव्हर, फ्रेड क्लासेन, स्टीफन मायबर्ग, मॅक्स ओ’डॉड, टिम प्रिंगल, लोगन व्हॅन बीक, टिम व्हॅन डर गुगेन, रुलोफ व्हॅन डर मर्वे, पॉल व्हॅन मीकेरेन.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
“सूर्याला कसोटीमध्ये संधी आणि मग खेळ पाहा”; भारतीय दिग्गजाची संघ व्यवस्थापनाकडे मागणी
“युवी माझ्यावर नाराज झाला असेल”; रोहितने केला धक्कादायक खुलासा






