टी20 विश्वचषक 2024 चा 11 वा सामना अमेरिका आणि पाकिस्तान यांच्यात खेळला गेला. डल्लास येथील ग्रँड प्रेरी क्रिकेट स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात पाकिस्तानला अमेरिकेविरुद्ध दारूण पराभवाला सामोरं जावं लागलं. 20 षटकांच्या खेळात सामना ड्रॉ झाला होता. त्यानंतर सुपर ओव्हरमध्ये अमेरिकनं पाकिस्तानला धूळ चारली. सामन्यानंतर पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम यानं संघाच्या पराभवामागचं कारण स्पष्ट केलं आहे.
अमेरिकेसारख्या छोट्या संघाला हलक्यात घेणं पाकिस्तानला महागात पडलं. या पराभवानंतर पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमला विचारण्यात आलं की, पाकिस्तानचे खेळाडू छोट्या संघांविरुद्धच्या सामन्याला हलक्यात घेतात का? यावर बाबर म्हणाला की, तयारी नेहमीच चांगली असते, पण याचा संबंध खेळाडूंच्या मानसिकतेशीही असू शकतो.
बाबर आझम म्हणाला, “जेव्हा तुम्ही स्पर्धेसाठी येता, तेव्हा तुम्ही नेहमीच सर्वोत्तम तयारी करता. तुम्ही म्हणू शकता की हा एक मानसिकतेचा खेळ आहे. जेव्हा तुम्ही अशा संघाविरुद्ध खेळता तेव्हा तुम्ही थोडी विश्रांती घेता. तुम्ही गोष्टी हलक्यात घेता. संघ कोणताही असो, तो तुम्हाला हरवू शकतो. आम्ही चांगली तयारी करत आहोत, मात्र एक संघ म्हणून आम्ही आमच्या योजना पूर्ण करू शकलो नाही.”
बाबर आझमनं कबूल केलं की, त्याच्या संघानं खेळाच्या तिन्ही विभागात चांगली कामगिरी केली नाही. त्याच्या मते फलंदाजांना मधल्या षटकांमध्ये आणि शेवटच्या षटकांमध्ये चांगली कामगिरी करणं आवश्यक आहे. बाबर म्हणाला, “पहिल्या 6 षटकांमध्ये फलंदाजी करताना, आम्ही परिस्थितीचा फायदा उचलू शकलो नाही. सलग दोन विकेट्स गेल्यानंतर तुम्ही बॅकफूटवर येता. एक फलंदाज म्हणून तुम्हाला पुढे जाऊन भागीदारी करणं आवश्यक आहे. पहिल्या 6 षटकांमध्ये आम्ही चांगली कामगिरी करू शकलो नाही, ज्याचा फटका आम्हाला सहन करावा लागला. याचं संपूर्ण श्रेय अमेरिकेला जातं. ते तिन्ही विभागांमध्ये आमच्यापेक्षा चांगले खेळले. आम्हाला या परिस्थितीचं मूल्यांकन करणं आवश्यक आहे.”
महत्त्वाच्या बातम्या –
“ही इतिहासाची पुनरावृत्ती…”, अमेरिकेविरुद्ध पाकिस्तानच्या लाजिरवाण्या पराभवानंतर शोएब अख्तर भडकला!
पाकिस्तानची नाचक्की! सुपर ओव्हरमध्ये महाराष्ट्राच्या पोराकडून चारीमुंड्या चीत, इतिहासातील सर्वात वाईट पराभव
कोण आहे सौरभ नेत्रावळकर? सुपर ओव्हरमध्ये पाकिस्तानला चारली धूळ, लिंकडीन प्रोफाईलचा स्क्रिन शॅाट व्हायरल