2024 टी20 विश्वचषकासाठी पाकिस्तानच्या 15 सदस्यीय संघाची घोषणा झाली आहे. बाबर आझमच्या नेतृत्वाखाली हा संघ दुसऱ्यांदा टी20 विश्वचषक जिंकण्याच्या इराद्यानं मैदानात उतरेल. पाकिस्ताननं 2009 मध्ये शेवटचा टी20 विश्वचषक जिंकला होता. मात्र त्यानंतर हा संघ एकदाही चॅम्पियन बनू शकला नाही. यावेळी वेस्ट इंडिज आणि अमेरिका यांच्या संयुक्त विद्यमाने टी20 विश्वचषकाचं आयोजन होणार आहे.
2024 च्या टी20 विश्वचषकासाठी पाकिस्तान संघात कोणतेही मोठे बदल करण्यात आलेले नाहीत. हसन अली आधीच संघाबाहेर होता. मात्र या संघाचा उपकर्णधार कोण असेल, हे जाहीर करण्यात आलेलं नाही. संघातील राखीव खेळाडू कोण असतील हेही जाहीर करण्यात आलेलं नाही. काही टीकेनंतरही उस्मान खानला संघात स्थान देण्यात आलं आहे. तर अबरार अहमदची दुसरा लेग स्पिनर म्हणून निवड करण्यात आली आहे. या विश्वचषकासाठी हरिस रौफचं पाकिस्तान संघात पुनरागमन झालंय.
यावेळी पाकिस्तानला भारतासोबत ‘अ’ गटात स्थान देण्यात आलं असून या गटात आयर्लंड, कॅनडा आणि यजमान अमेरिका यांचाही समावेश आहे. 9 जून रोजी भारत आणि पाकिस्तान आमनेसामने येतील. पाकिस्तानला पहिला सामना 6 जून रोजी अमेरिकेविरुद्ध खेळायचा आहे, तर दुसरा सामना भारतासोबत होणार आहे. पाकिस्तान आपला तिसरा सामना 11 जून रोजी कॅनडासोबत खेळेल, तर चौथा सामना 16 जून रोजी आयर्लंडशी खेळला जाईल.
टी20 विश्वचषक 2024 साठी पाकिस्तानचा संघ – बाबर आझम (कर्णधार), अबरार अहमद, आझम खान, फखर जमान, हरिस रौफ, इफ्तिखार अहमद, इमाद वसीम, मोहम्मद अब्बास आफ्रिदी, मोहम्मद अमीर, मोहम्मद रिझवान, नसीम शाह, सईम अयुब, शादाब खान, शाहीन शाह आफ्रिदी, उस्मान खान
महत्त्वाच्या बातम्या –
आयपीएल 2025 साठी ‘या’ 4 खेळाडूंना रिटेन करू शकते दिल्ली कॅपिटल्स, वॉर्नर-शॉ होणार रिलीज!