क्रिकेटच्या मैदानावर पाकिस्तानने पुन्हा एकदा भारतीय संघासमोर नांगी टाकली आहे. 15 फेब्रुवारीला कोलंबोमध्ये भारत आणि पाकिस्तान (India vs Pakistan) दरम्यान अटीतटीचा सामना होईल अशी अपेक्षा होती, पण पाकिस्तानने सपशेल शरणागती पत्करली आणि भारताने सहज विजय मिळवला. या पराभवामुळे पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्यावरही नामुष्की ओढवली आहे.
सलमान अली आगाच्या (Salman Ali Agha) नेतृत्वाखाली पाकिस्तान संघ भारताकडून सलग 3 टी-20 सामने हरला आहे. याआधी सप्टेंबरमध्ये झालेल्या आशिया चषकातही भारताने पाकिस्तानला तीन वेळा धूळ चारली होती आणि फायनलमध्ये नमवून विजेतेपद पटकावले होते. त्यावेळीही सूर्यकुमार यादव भारताचा, तर सलमान अली आगा पाकिस्तानचा कर्णधार होता.
15 फेब्रुवारीला कोलंबोमध्ये झालेल्या सामन्यात पाकिस्तानने टॉस जिंकून पहिल्यांदा गोलंदाजीचा निर्णय घेतला, जो त्यांच्यावरच उलटला. सामना सुरू होताच (संध्याकाळी 7 वाजता) पंतप्रधान शहबाज शरीफ यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट केली होती. त्यांनी लिहिले होते, कोलंबोच्या मैदानावर उतरणाऱ्या ‘मेन इन ग्रीन’ला (पाक संघाला) माझ्या शुभेच्छा. आत्मविश्वासाने खेळा आणि तुमची सर्वोत्तम कामगिरी करा. पंतप्रधानांना वाटले होते की त्यांचा संघ भारताला हरवेल, पण संघाने त्यांचा जगभरात अपमान करून टाकला.
पण, सामन्याचा निकाल पहिल्या 20 ओव्हरमध्येच लागला. भारताने पहिल्या डावात 175 धावा केल्या आणि पाकिस्तानसमोर 176 धावांचे लक्ष्य ठेवले. पाकिस्तानला आशा होती की ते हे लक्ष्य गाठतील, पण पहिल्या दोन ओव्हर्समध्येच सर्व खेळ संपला. पहिल्या ओव्हरमध्ये हार्दिक पांड्याने धक्का दिला. दुसऱ्या ओव्हरमध्ये जसप्रीत बुमराहने दोन विकेट्स घेऊन पाकिस्तानचे कंबरडेच मोडले. यानंतर शहबाज शरीफ यांनी सोशल मीडियावर इतर काही पोस्ट केल्या, पण त्यांच्या त्या शुभेच्छांच्या पोस्टवर लोक आता त्यांची जोरदार फिरकी घेत आहेत आणि त्यांची थट्टा केली जात आहे.





