दक्षिण आफ्रिकेच्या पाकिस्तान दौऱ्यावरील पहिल्या कसोटी सामन्यात पाकिस्तानच्या संघाने चौथ्या दिवशीच विजय मिळविला. दक्षिण आफ्रिकेने दिलेल्या ८८ धावांचा पाठलाग करताना पाकिस्तानने ७ गडी राखून हा विजय साकारला. यासह दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेत १-० अशी आघाडी मिळवली. दुसरीकडे तब्बल चौदा वर्षांनंतर पाकिस्तानचा दौरा करणाऱ्या दक्षिण आफ्रिकेची सुरुवात पराभवाने झाली.
नौमान अली-यासिर शहा चमकले
पाकिस्तानच्या संघाकडून फिरकीपटू नौमान अली आणि यासिर शहाची कामगिरी लक्षवेधी ठरली. या दोन गोलंदाजांनी दक्षिण आफ्रिकेच्या दुसऱ्या डावात एकूण ९ गडी बाद करत पाहुण्या संघाच्या फलंदाजीला खिंडार पाडले. डावखुरा फिरकी गोलंदाज नौमान अलीने ३५ धावांत ५ तर लेगस्पिनर यासिर शहाने ७९ धावांत ४ बळी घेतले. त्यामुळे दक्षिण आफ्रिकेचा दुसरा डाव २४५ धावांवर संपुष्टात आला. आफ्रिकेकडून एडीन मार्क्रमने सर्वाधिक ७४ धावांची खेळी केली.
८८ धावांचे सोपे लक्ष्य
पाकिस्तान संघाकडे पहिल्या डावात १५८ धावांची आघाडी असल्याने चौथ्या डावात त्यांना ८८ धावांचे सोपे लक्ष्य मिळाले. या लक्ष्याचा पाठलाग करताना यजमानांची २ बाद २३ अशी अडखळत सुरुवात झाली होती. मात्र अझर अलीने नाबाद ३१ आणि कर्णधार बाबर आझमने ३० धावांची खेळी करत पाकिस्तानचा विजय सुनिश्चित केला.
विजयासाठी ३ धावा शिल्लक असताना बाबर आझम केशव महाराजच्या गोलंदाजीवर बाद झाला. मात्र पहिल्या डावातील शतकवीर फवाद आलमने खणखणीत चौकार मारत पाकिस्तानच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. त्यालाच या शतकासाठी सामनावीर पुरस्काराने गौरविण्यात आले.
संक्षिप्त धावफलक:
दक्षिण आफ्रिका (पहिला डाव) – २२०/१० (डीन एल्गर ५८/ यासिर शहा ५४/३ )
पाकिस्तान (पहिला डाव) – ३७८/१० (फवाद आलम १०९/ कागिसो रबाडा ७०/३ )
दक्षिण आफ्रिका (दुसरा डाव) – २४५/१० (एडीन मार्क्रम ७४/ नौमान अली ३५/५ )
पाकिस्तान (दुसरा डाव) – ९०/३ (अझर अली ३१*/ अॅनरीच नॉर्त्जे २४/२ )
महत्वाच्या बातम्या:
इंग्लंडकडे काही दमदार खेळाडू आहेत, जे भारताला देऊ शकतात आव्हान, माजी दिग्गजाचे भाष्य
रिषभ पंत भविष्यातील स्टार, भारताच्या फलंदाजी प्रशिक्षकांनी केली मुक्तकंठाने प्रशंसा
पदार्पणाच्या सामन्यातच पाकिस्तानच्या या फिरकीपटूचा धुमाकूळ; ७१ वर्षांनंतर केलाय मोठा कारनामा