---Advertisement---

पाकिस्तानच्या महिला गोलंदाजांपुढे फिकी पडली भारतीय फलंदाजी, चौथ्या सामन्यात टीम इंडिया ऑल आऊट

On: शुक्रवार, ऑक्टोबर 7, 2022 4:23 PM
India-Women-vs-Pakistan-Women
---Advertisement---

महिला आशिया चषक 2022मधील 13वा सामना भारतीय महिला विरुद्ध पाकिस्तान महिला संघात पार पडला. शुक्रवारी (दि. 7 ऑक्टोबर) पार पडलेल्या या सामन्यात पाकिस्तान संघाने 13 धावांनी विजय मिळवला. या स्पर्धेत भारतीय संघाला पहिला पराभव पत्करावा लागला. यापूर्वी खेळलेल्या तिन्ही सामन्यात भारताने विजय मिळवला होता. या पराभवामुळे आता भारताचे गुणतालिकेतील स्थान धोक्यात आले आहे.

या सामन्यात पाकिस्तान महिला संघाने (Pakistan Women) नाणेफेक जिंकत फलंदाजीचा निर्णय घेतला होता. हा निर्णय पाकिस्तानी फलंदाजांनी योग्य असल्याचे सिद्ध करत निर्धारित 20 षटकात 6 विकेट्स गमावत 137 धावा चोपल्या होत्या. या आव्हानाचा पाठलाग करताना भारतीय महिला संघाला (Indian Women) सर्वबाद 124 धावाच करता आल्या, त्यामुळे पाकिस्तानने 13 धावांनी विजय मिळवला.

भारतीय संघाकडून फलंदाजी करताना रिचा घोष (Richa Ghosh) हिने सर्वाधिक धावा केल्या. तिने 13 चेंडूत 26 धावा चोपल्या. या धावा करताना तिने 1 चौकार 3 षटकार मारले. तिच्याव्यतिरिक्त दयालन मेहलता (20), स्म्रिती मंधाना (17), दिप्ती शर्मा (16), एस मेघना (15) आणि कर्णधार हरमनप्रीत कौर (12) यांनाच दोन आकडी धावसंख्या पार करता आली. इतर एकाही फलंदाजाला 10 धावांचा आकडाही पार करता आला नाही.

यावेळी पाकिस्तानकडून गोलंदाजी करताना नशरा संधू हिने सर्वाधिक विकेट्स घेतल्या. तिने 4 षटके गोलंदाजी करताना 30 धावा देत 3 विकेट्स घेतल्या. तिच्याव्यतिरिक्त सदिया इकबाल आणि निदा दर यांनी प्रत्येकी 2 विकेट्स घेतल्या. तसेच, तुबा हसन हिला एक विकेट घेण्यात यश आले.

तत्पूर्वी प्रथम फलंदाजी करताना पाकिस्तान संघाकडून निदा दर हिने नाबाद सर्वाधिक 56 धावांची खेळी केली. या धावा तिने 37 चेंडूत 1 षटकार आणि 5 चौकारांच्या मदतीने चोपल्या. तिच्याव्यतिरिक्त कर्णधार बिस्माह मरूफ (32), मुनीबा अली (17), सिदरा अमीन (11) यांनीही मोलाचे योगदान दिले. इतर एकाही फलंदाजाला दोन आकडी धावसंख्या पार करता आली नाही.

यावेळी भारतीय संघाकडून गोलंदाजी करताना दिप्ती शर्मा (Deepti Sharma) हिने सर्वाधिक विकेट्स घेतल्या. तिने 4 षटके गोलंदाजी करताना 27 धावा देत 3 विकेट्स घेतल्या. तिच्याव्यतिरिक्त पूजा वस्त्राकार हिने 2 आणि रेणुका सिंग हिने 1 विकेट घेतली.

पाकिस्तानने भारतीय संघाला पराभूत करत गुणतालिकेतील आपला रनरेट मजबूत केला. या विजयानंतर पाकिस्तानने 4 पैकी 3 सामन्यात विजय मिळवला आहे. तसेच, भारतानेही 4 पैकी 1 सामना गमावत 3 सामन्यात विजय मिळवला आहे. भारत गुणतालिकेत अव्वलस्थानी असून त्यांचे 6 गुण आहेत. तसेच, भारताचा नेट रनरेट 2.519 इतका आहे, तर पाकिस्तान 6 गुणांसह दुसऱ्या स्थानी आहे आणि त्यांची नेट रनरेट 1.665 इतका आहे.

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
आता बॅटही धरता येणार नाही! टी-20 विश्वचषकाच्या तोंडावर न्यूझीलंडच्या अष्टपैलूला गंभीर दुखापत

INDvSA: काय सांगता, संजू सॅमसनने वनडेमध्ये सरासरीत विराट-धोनीला टाकले मागे

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---