पाकिस्तान संघाचे आजी-माजी खेळाडू नेहमीच भारताविषयी वक्तव्य करत असतात. आता या खेळाडूमध्ये सईद अजमल याच्या नावाचाही समावेश झाला आहे. अजमलची गणना पाकिस्तानच्या शानदार फिरकीपटूंमध्ये होते. तो असा खेळाडू ठरला, ज्याच्या कारकीर्दीवर वेगळ्याच कारणामुळे ब्रेक लागला. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 200हून अधिक सामने खेळणाऱ्या अजमलची गोलंदाजी ऍक्शन संशयास्पद मानली गेली आणि आयसीसीने त्याला गोलंदाजी करण्यावर बंदी घातली. याच अजमलने भारताविषयी मोठे विधान केले आहे.
काय म्हणाला सईद अजमल?
सईद अजमल (Saeed Ajmal) याने म्हटले की, जर तो भारताकडून क्रिकेट खेळला असता, तर त्याने एक हजारपेक्षा जास्त विकेट्स घेतल्या असत्या. एका पॉडकास्टशी बोलताना तो म्हणाला की, “प्रामाणिकपणे सांगतो, मी जर भारताकडून खेळलो असतो, तर 1 हजार विकेट्स घेतल्या असत्या. मी असा गोलंदाज होतो, जो दर वर्षी जवळपास 100 विकेट्स घेत होतो.”
त्याच्या गोलंदाजीवर घातलेल्या बंदीविषयी बोलताना तो म्हणाला की, “2009मध्ये क्रिकेटमध्ये पदार्पण करताच आयसीसीने मला खेळण्यापासून रोखले पाहिजे होते. मात्र, त्यांनी या प्रकरणाची तेव्हा दखल घेतली, जेव्हा मी जगातील अव्वल दर्जाचा गोलंदाज बनलो होतो. ज्यावेळी मी 400हून अधिक विकेट्स घेतल्या, तेव्हा त्यांना जाणवले की, मला रोखण्याचा मार्ग शोधण्याची गरज आहे. त्यामुळे त्यांनी असे केले. जेव्हा मला गोलंदाजी करण्यावर बंदी घातली, तेव्हा मी जगातील अव्वल क्रमांकाचा गोलंदाज होतो.”
यादरम्यान सईदला, जगातील अव्वल क्रमांकाचा गोलंदाज असूनही त्याला वनडेत कोणताही सामनावीर पुरस्कार मिळाला नाही, यामागील कारण काय होते, असा प्रश्न विचारण्यात आला. यावर तो म्हणाला की, “माझे नशीब खराब राहिले. तिसऱ्या सामन्यातच मी 5 विकेट्स घेतल्या होत्या, ज्या आताच्या भारताविरुद्ध माझ्या कारकीर्दीतील सर्वोत्तम गोलंदाजी होती. संपूर्ण संघ 175 धावांवर बाद झाला होता. मात्र, धोनीला सामनावीर पुरस्कार देण्यात आला.”
कोणत्याही फलंदाजाला बाद केल्यानंतर अभिमान वाटला का? यावर सईदने सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) याचे नाव घेतले. सईद म्हणाला की, “याविषयी अजूनही वादविवाद सुरू आहे. विश्वचषक 2011च्या उपांत्य सामन्यात माझ्या चेंडूवर तो बाद झाला होता, पण तिसऱ्या पंचांच्या निर्णयामुळे त्याला पुन्हा नाबाद घोषित केले गेले.” सईदला आजही वाटते की, त्याने सचिनला बाद केले होते. इंग्लंडचे पंच इयान गोल्ड यांनीही नुकतेच म्हटले होते की, सचिन त्यावेळी बाद होता, पण तिसऱ्या पंचांनी त्यांचा निर्णय बदलला होता.
तसं पाहिलं तर, 2008 ते 2015 यादरम्यान क्रिकेट खेळताना सईदने जगातील अनेक फलंदाजांना आपल्या गोलंदाजीने त्रास दिला होता. एवढंच नाही, तर तो वनडे आणि टी20 क्रमवारीत जगातील अव्वल क्रमांकाचा गोलंदाजही राहिला होता. त्याने पाकिस्तानकडून 35 कसोटीत 178, 113 वनडेत 184 आणि 64 टी20 सामन्यात 85 म्हणजेच एकूण 447 विकेट्स घेतल्या होत्या. (pakistans former spinner saeed ajmal on team india know here)
महत्वाच्या बातम्या-
मोठी बातमी! वर्ल्डकप क्वालिफायरमध्ये सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या गोलंदाजावर ICCची कारवाई, काय होती चूक?
स्टार्कच्या कॅचवर टीव्ही पंचांचा Not Out निर्णय, ऑस्ट्रेलियन दिग्गजाने फटकारत म्हटले, ‘हा मोठा मूर्खपणा…’