नुकत्याच पार पडलेल्या महिला विश्वचषकाच्या भारत वि. पाकिस्तान या सामन्याची जोरदार चर्चा झाली. त्याला तसे कारण देखील होते. सर्वप्रथम, भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये असलेले वाद, ज्यामुळे जागरूक होणारा देशाभिमान आणि दुसरं म्हणजे चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात पाकिस्तानच्या पुरुष संघाने भारताला नमवले असल्यामुळे झालेली चिडचिड. या सगळ्या गोष्टीला पूर्णविराम दिला ते भारतीय महिला संघाने पाकिस्तानला ९५ धावाने हरवून.
पण या सगळ्याच्या पलीकडे जाऊन जेव्हा आपण पाहतो की सामना संपल्यावर विराट कोहली युवराज सिंग आणि शोएब मलिक एका विनोदावर हसतात तेव्हा आपल्याला त्यांच्या मैत्रीची देखील जाणीव होते. अशीच काहीशी गोष्ट भारत पाकिस्तान महिला सामन्यानंतर देखील घडली.
ही गोष्ट मात्र होती आपल्या आदर्शासोबत खेळण्याची. पाकिस्तानची वेगवान गोलंदाज कैनात इम्तियाजने नुकताच एक फोटो आपल्या इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. तो फोटो तिची संपूर्ण गोष्ट सांगून जातो.
“२००५ साली भारतीय महिला क्रिकेट संघ पाकिस्तानमध्ये एशिया कपसाठी आला होता तेव्हा मी बॉल पिकर होते. तेव्हा मी भारतीय संघाला पहिल्यांदा पाहिले. मी झुलन गोस्वामीला पाहिले, त्यावेळची ती सर्वात वेगवान गोलंदाज होती. मी इतकी प्रभावित झाले की मी क्रिकेटर होण्याच्या निर्णय घेतला आणि ते ही वेगवान गोलंदाज म्हणून. आज १२ वर्षांनी मी विश्वचषक तिच्या सोबत खेळते आहे हे माझे भाग्य आहे. मला आता आणखी प्रेरणा मिळाली आहे. ” ,कैनात आपल्या इंस्टाग्राम पोस्ट मध्ये म्हणते.
https://www.instagram.com/p/BWFee77lnCJ/?taken-by=kainatimtiaz23