हैद्राबाद। भारत विरुद्ध विंडिज संघात राजीव गांधी आंतराष्ट्रीय स्टेडीयमवर दुसरा कसोटी सामना सुरु आहे. या सामन्यात भारताने दुसऱ्या दिवसाखेर पहिल्या डावात 4 बाद 308 धावा केल्या आहेत.
भारताकडून रिषभ पंत आणि अजिंक्य रहाणे यांनी नाबाद अर्धशतक केले आहे. रिषभने 120 चेंडूत नाबाद 85 आणि रहाणेने 174 चेंडूत नाबाद 75 धावा केल्या आहेत.
याबरोबरच यष्टीरक्षक फलंदज रिषभ पंतने अर्धशतक करताना एक खास विक्रम केला आहे. त्याने कसोटीमध्ये सलग तिसऱ्या डावात 50 पेक्षा जास्त धावा करण्याचा विक्रम केला आहे. असे करणारा तो एमएस धोनी नंतरचा दुसराच भारतीय यष्टीरक्षक फलंदाज ठरला आहे.
रिषभने इंग्लंड विरुद्धच्या द ओव्हल मैदानावर झालेल्या पाचव्या आणि शेवटच्या कसोटी सामन्यात दुसऱ्या डावात शतक केले होते. त्यानंतर त्याने विंडिज विरुद्धच्या पहिल्या कसोटीतही 92 धावांची अर्धशतकी खेळी केली. विंडिजला या सामन्यात भारताने फॉलोआॅन दिला होता. त्यामुळे भारताने एकाच डावात फलंदाजी केली.
त्यानंतर आता रिषभने विंडिज विरुद्ध दुसऱ्या कसोटी सामन्यातही पहिल्याच डावात नाबाद अर्धशतकी खेळी केली आहे.
धोनीने 2008 आणि 2009 या दोनवर्षी कसोटीमध्ये सलग तीन डावात 50 पेक्षा जास्त धावा करण्याचा पराक्रम केला आहे.
भारताकडून विंडिज विरुद्ध दुसऱ्या कसोटी सामन्यात पृथ्वी शॉने 70 धावांची अर्धशतकी खेळी केली आहे. तसेच कर्णधार विराट कोहलीने 45, केएल राहुलने 4 आणि चेतेश्वर पुजाराने 10 धावा केल्या आहेत.
तत्पूर्वी, भारताचा वेगवान गोलंदाज उमेश यादवने 88 धावांत 6 विकेट घेत विंडिजला पहिल्या डावात 311 धावांवर रोखण्यात महत्त्वाची कामगिरी बजावली होती.
महत्त्वाच्या बातम्या:
–पी कश्यपचा पासपोर्ट गहाळ; भारतीय परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांची मागितली मदत
–विराटसोबतचा सेल्फी पडला महागात, चुकवावी लागणार मोठी किंमत
–अशी कामगिरी करणारा लक्ष्य सेन ठरला दुसराच भारतीय