टी20 विश्वचषक 2022 (T20 World Cup 2022)साठी काही दिवसच शिल्लक आहेत. या स्पर्धेसाठी सगळ्या संघांनी आपापल्या 15 सदस्यीय खेळाडूंची नावे जाहिर केले आहेत. मात्र भारतीय संघाच्या अडचणीत वाढ होताना दिसत आहेत. सध्या भारतीय संघासमोर विकेटकीपरचा प्रश्न निर्माण झाला आहे. 15 सदस्यांच्या संघामध्ये रिषभ पंत आणि दिनेश कार्तिक यांचा समावेश आहे. ऑस्ट्रेलिया विरुद्ध खेळल्या जाणाऱ्या टी20 मालिकेच्या पहिल्या सामन्यात पंत बाकावर राहिला तर कार्तिकला अंतिम अकरामध्ये जागा मिळाली. अशात या दोघांपैकी कोणाला पुढील मालिकांमध्ये खेळवावे, याबाबत दिग्गज विकेटकीपरने त्याचे मत सांगितले आहे.
ऑस्ट्रेलियाचा माजी विकेटकीपर-फलंदाज ऍडम गिलख्रिस्ट (Adam Gilchrist) याने रिषभ पंत (Rishabh Pant) की दिनेश कार्तिक (Dinesh Karthik) यांच्यापैकी कोण याबाबत आयसीसीशी बोलताना आपले मत व्यक्त केले आहे. तो म्हणाला, “रिषभ पंत हा ज्या ताकदीने खेळतो आणि ज्याप्रकारे विरोधी संघाच्या गोलंदाजांवर तुटून पडतो यावरून तो भारताच्या फलंदाजीसाठी योग्य पर्याय आहे. पंत आणि कार्तिक खेळू शकतात, मात्र माझ्यामते पंतला संघात घेणे अत्यावश्यक आहे.”
गिलक्रिस्टला विचारले गेले की भारतीय संघाच्या अंतिम अकरामध्ये पंत आणि कार्तिक या दोघांनाही खेळवले पाहिजे का, याचे उत्तर देताना तो म्हणाला, “या दोघांना अंतिम अकरामध्ये खेळताना पाहणे रोमांचक ठरणार आहे. मला वाटते की असे केले जाऊ शकते. दिनेश कार्तिकच्या फलंदाजीची शैली पाहता त्याला वरच्या क्रमांकावर फलंदाजीसाठी पाठवले जाऊ शकते.”
कार्तिकने भारतीय संघात पुनरागमन केल्यानंतर अनेक सामन्यांमध्ये फिनिशरची भुमिका योग्यरितीने पार पाडताना संघाला सामने जिंकून दिले आहेत.
टी20 विश्वचषकासाठी भारतीय संघ –
रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), विराट कोहली, सूर्यकुमार यादव, दीपक हुडा, रिषभ पंत (विकेटकीपर), दिनेश कार्तिक (विकेटकीपर), हार्दिक पंड्या, रविचंद्रन अश्विन, युझवेंद्र चहल, अक्षर पटेल, जसप्रीत बुमराह, भुवनेश्वर कुमार, हर्षल पटेल, अर्शदीप सिंग.