भारताचे माजी क्रिकेटपटू युवराज सिंग, हरभजन सिंग आणि सुरेश रैना यांचा ‘तौबा-तौबा’ गाण्यावर विचित्र डान्स करतानाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. युवराज सिंगच्या नेतृत्वाखाली टीम इंडियानं अलीकडेच वर्ल्ड चॅम्पियनशिप ऑफ लिजेंड्स 2024 ची ट्रॉफी जिंकली. या विजयानंतर या तिघांनी तौबा-तौबा गाण्यावर ज्या पद्धतीनं डान्स केला, त्यामुळे ते वादात सापडले आहेत.
हरभजन सिंगनं त्याच्या इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. व्हिडिओत प्रथम युवराज सिंग आपल्या दोन्ही पायानं लंगडत दारातून एंट्री घेताना दिसतो. त्यानंतर हरभजन आणि नंतर सुरेश रैना देखील विचित्र हावभाव करत लंगड्या स्टाईलमध्ये डान्स करत येतात. आता यावर भारतीय पॅरालिम्पिक समितीनं आक्षेप घेतला असून, समितीनं युवराज, हरभजन आणि रैना यांना माफी मागण्याची विनंती केली आहे.
‘पॅरालिम्पिक कमिटी ऑफ इंडिया’नं या व्हायरल व्हिडिओच्या कमेंट सेक्शनमध्ये लिहिलं – “हे अत्यंत घृणास्पद आणि असंवेदनशील कृत्य आहे. स्टार सेलिब्रेटी असल्यानं तुम्ही चांगलं उदाहरण घालून समाजात सकारात्मकता पसरवायला हवी. परंतु तुम्ही येथे अपंगांची चेष्टा उडवत आहात. असे अपमानास्पद हावभाव करून तुम्ही शारीरिकदृष्ट्या अपंगांची अवहेलना करत आहात. असे हातवारे करणे म्हणजे नुसती मजा करणे नव्हे तर भेदभाव आहे. या चुकीबद्दल माफी मागितली पाहिजे.”
भारताचा पॅरा जलतरणपटू शम्स आलम यानेही युवराज, हरभजन आणि रैना यांच्या व्हिडिोओवर अशीच प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, “अनेक दिवस चालणाऱ्या स्पर्धेनंतर शरीर दुखू लागतं हे आम्हाला चांगलंच समजतं. पण तुम्ही सोशल मीडियावर ज्याप्रकारे हावभाव करत आहात, त्यामुळे तुम्ही अपंग समाजाची चेष्टा करत आहात. ही कृती निंदनीय आहे. मला माहीत आहे की माझी टिप्पणी तुम्हाला कोणत्याही प्रकारे प्रभावित करणार नाही, परंतु कल्पना करा की तुमच्या एखाद्या नातेवाईकासोबतही असंच घडले तर. तरीही तुम्ही असंच वागणार का? आम्ही सर्व तुमचा आदर करतो. आशा आहे की तुम्ही लोक हा मुद्दा समजून घ्याल आणि त्यानुसार प्रतिसाद द्याल.”
महत्त्वाच्या बातम्या –
पाकिस्तानची विचित्र मागणी, चॅम्पियन्स ट्रॉफी बाबत भारताकडून लेखी उत्तर मागितलं; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
डेव्हिड वॉर्नर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये परतणार का? निवडकर्त्यांनी घेतला मोठा निर्णय
पाकिस्तान क्रिकेट बोर्डाची बीसीसीआयला धमकी! “भारत चॅम्पियन्स ट्रॉफी खेळण्यासाठी आला नाही तर…”