प्रो कबड्डी सीजन ७ मध्ये काल (२६ सप्टेंबर) पाटणा पायरेट्स विरुद्ध दबंग दिल्ली यांच्यात सामना झाला. दोन्ही संघात अटीतटीची लढत बघायला मिळाली. शेवटच्या तीन मिनिटामध्ये पाटणाकडे ३६-३० अशी आघाडी असताना दिल्लीच्या विजयने ५ गुणांची सुपररेड करत सामन्यांत चुरस वाढवली. दिल्लीने पाटणावर लोन टाकत विजय संपादन केला.
या सीजनमध्ये पटणाची कामगिरी खास झाली नसली तरीही परदीपने मात्र जवळजवळ प्रत्येक सामन्यात काही ना काही विक्रम केले आहेत. त्याने काल झालेल्या सामन्यांतही १९ रेड पॉइंट्स मिळवत ३ विक्रम केले आहेत.
परदीपने प्रो कबड्डीमध्ये ११०० रेड पॉइंट्सचा टप्पा पार केला आहे. प्रो कबड्डीच्या इतिहासात ११०० रेड पॉइंट्सचा पल्ला गाठणारा तो पहिलाच खेळाडु ठरला आहे. सीजन ७ सुरू झाल्यापासून ९००, १००० आणि ११०० रेड पॉइंट्स असे तीन महत्त्वाचे पल्ले त्याने पार केले आहेत.
त्याचे आता प्रो कबड्डीमध्ये १०४ सामन्यात ११०१ रेड पॉइंट्स झाले आहेत.
तसेच त्याने कालच्या सामन्यांत १ सुपर रेड करत प्रो कबड्डीत ५० सुपर रेड देखील पूर्ण केल्या. प्रो कबड्डीत ५० सुपर रेड पूर्ण करणाराही तो पहिलाच खेळाडु ठरला. परदीपच्या या विक्रमच्या जवळपासही कोणी नाही. परदीप नंतर रिशांक देवडिगाच्या नावावर २५ सुपर रेड आहे.
याबरोबरच प्रो कबड्डी सीजन ७ मध्ये परदीपने सलग ९ सुपरटेन करत स्वतःचा विक्रमही मोडला. सीजन ५ मध्ये प्रदीपने सलग ८ सुपरटेन केले होते. प्रदीपने जरी सलग ९ सुपरटेन करत स्वतःचा विक्रम मोडला असला तरी प्रो कबड्डीत सर्वाधिक सलग सुपरटेन करण्याचा विक्रम नवीन कुमारच्या नावावर आहे. त्याने सलग १६ सुपरटेन करण्याचा पराक्रम केला आहे.
प्रो कबड्डी सीजन ७मध्येही सर्वाधिक रेड पॉइंट्स मिळवणारा कबड्डीपटू –
परदीपने सीजन ७ मध्ये पवन शेरावतला मागे टाकत सर्वाधिक रेड पॉइंट्स मिळवण्याच्या यादीतही पहिल्या स्थानावर झेप घेतली. सध्या सीजन ७ परदीप २४३ पॉइंट्ससह पहिल्या तर २३२ पॉइंट्ससह पवन शेरावत दुसऱ्या स्थानी आहे.
परदीपने प्रो कबड्डीत केले हे खास विक्रम –
#प्रो कबड्डीमध्ये सर्वाधिक रेड पॉइंट्स मिळवणारे कबड्डीपटू –
११०१ – परदीप नरवाल (१०४ सामने)
९३८ – राहुल चौधरी (११८ सामने)
८४४ – दीपक हुड्डा (१२२ सामने)
७९० – अजय ठाकूर (११५ सामने)
७१८ – मनिंदर सिंग (७८ सामने)
#प्रो कबड्डीमध्ये सर्वाधिक सुपर रेड करणारे कबड्डीपटू –
५० – परदीप नरवाल
२५ – रिशांक देवाडिगा
२४ – राहुल चौधरी
२३ – अजय ठाकूर
२३ – काशिलिंग अडके
#प्रो कबड्डीमध्ये सर्वाधिक सगल सुपर टेन मिळवणारे कबड्डीपटू –
१६* – नवीन कुमार (सीजन ७)
९* – परदीप नरवाल (सीजन ७)
८ – परदीप नरवाल सलग (सीजन ५)
क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.
महत्त्वाच्या बातम्या –
–मराठमोळ्या पंकज मोहितेची प्रो कबड्डी सीजन ७ मध्ये मोठी कामगिरी, केला हा पराक्रम
–अनुभवी तमिळ थलायवाज प्ले-ऑफमधून बाहेर, तर हे दोन संघ प्ले-ऑफसाठी ठरले पात्र