पुणे, 10 सप्टेंबर2023: प्रत्येक खेळाडूच्या यशामध्ये त्याने घेतलेल्या अफाट कष्टाबरोबरच त्याच्यासाठी त्याग करणाऱ्या व त्याच्यामागे खंबीरपणे उभे राहणाऱ्या आई-वडिलांचाही सिंहाचा वाटा असतो असे महाराष्ट्र बुद्धिबळ संघटनेचे उपाध्यक्ष ग्रॅंड मास्टर अभिजीत कुंटे यांनी सांगितले.
ग्रँडमास्टर किताब मिळवणाऱ्या आदित्य सामंत याचा बुद्धिबळ क्रीडा ट्रस्ट तर्फे सत्कार करण्यात आला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून मेजर ध्यानचंद पुरस्कार विजेते ग्रँड मास्टर अभिजीत कुंटे, महाराष्ट्र बुद्धिबळ संघटनेचे सचिव निरंजन गोडबोले, पुणे जिल्हा बुद्धिबळ संघटनेचे उपाध्यक्ष प्रकाश कुंटे, पीडीसीसीचे उपाध्यक्ष अश्विन त्रिमल, सचिव डॉक्टर संजय करवडे, पीडीसीसीचे आजीव सदस्य हर्निश राजा, सिंबायोसिस क्रीडा संस्थेचे माजी मानद संचालक डॉक्टर सतीश ठिगळे हे उपस्थित होते. आदित्य याचे वडील सचिन व आई संध्या यांचाही यावेळी सत्कार करण्यात आला. लक्ष्य फाउंडेशन तर्फे सुंदर अय्यर यांच्या हस्ते आदित्य याचा गौरव करण्यात आला.
अभिजीत कुंटे यांनी सांगितले,” कोणत्याही खेळात यश मिळवण्यासाठी चिकाटी, संयम, आत्मविश्वास आणि कष्ट करण्याची वृत्ती आवश्यक असते. सुरुवातीला जरी अपयश मिळाले तरी कालांतराने आपण सातत्याने यशाची मालिका ठेवत असतो. आदित्य हा अतिशय कष्टाळू आणि संयमी खेळाडू आहे त्यामुळेच त्याने आंतरराष्ट्रीय मास्टर व ग्रँडमास्टर हे दोन्ही किताब अतिशय कमी अंतराच्या काळात मिळवले आहेत. त्याचा आदर्श अन्य युवा खेळाडूंनी घेतला पाहिजे. ”
शालेय स्पर्धा हे करियर घडवण्यासाठी उत्तम व्यासपीठ आहे मी देखील शालेय स्पर्धांमध्ये अनेक वेळा सहभागी झालो. तेथील अनुभव माझ्यासाठी खूपच उपयुक्त होता त्यामुळेच मी आज यशाची चांगली पायरी गाठली आहे. या यशावर मी समाधान मानणार नाही. मला अजून खूप बराच मोठा पल्ला गाठायचा आहे असे आदित्य याने सांगितले.
डॉक्टर संजय करवडे, सुंदर अय्यर, अश्विन त्रिमल, आदित्यचे वडील सचिन यांनी यावेळी आपले विचार व्यक्त केले. या समारंभास ज्येष्ठ खेळाडू मृणालिनी कुंटे औरंगाबादकर, स्वाती घाटे तेली, ईशा करवडे,अभिषेक केळकर, ग्रँड मास्टर हर्षित राजा याचे वडील हर्निश राजा, आंतरराष्ट्रीय पंच राजेंद्र शिदोरे आदी उपस्थित होते. विनिता श्रोत्री यांनी स्वागत केले आणि आभार मानले.
ग्रँडमास्टर किताब मिळवणाऱ्या आदित्य सामंत याचा बुद्धिबळ क्रीडा ट्रस्ट तर्फे सत्कार करण्यात आला. यावेळी (डावीकडून) डॉक्टर सतीश ठिगळे, निरंजन गोडबोले, अभिजीत कुंटे, प्रकाश कुंटे, आदित्य सामंत, डॉक्टर संजय करवडे, सचिन सामंत, संध्या सामंत, हर्निश राजा, अश्विन त्रिमल, सुंदर अय्यर. (Parents play a big role in every athlete’s success – Kunte)
महत्वाच्या बातम्या –
भारताला स्वस्तात गुंडाळण्याची संधी पाकिस्तानकडून ड्रॉप! पावर प्लेमध्ये सलामीवीर फलंदाजाला जीवनदान
बाबो! 11 वनडे डावात रोहित-गिलच्या सलामी भागीदारीतून निघाल्या ‘एवढ्या’ धावा; 4 शतके अन् 8 अर्धशतकांचाही समावेश