पॅरिस ऑलिम्पिक 2024 बाॅक्सिंगमधून भारतासाठी निराशाजनक बातमी आली आहे. पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारताची बाॅक्सर लोव्हलिना बोर्गोहेनचा (Lovlina Borgohain) प्रवास संपला आहे. महिलांच्या 75 किलो गटाच्या उपांत्यपूर्व फेरीत चीनच्या ली कियाननं लोव्हलिनाचा 4-1 असा पराभव केला. या सामन्यात भारतीय बॉक्सरनं चांगली कामगिरी केली, मात्र चीनच्या बॉक्सरचं आव्हान तिला महागात पडलं. त्यामुळे सलग दुसरे ऑलिम्पिक पदक जिंकण्यापासून लोव्हलिना चुकली.
लोव्हलिनानं तिच्या शेवटच्या सामन्यात हॉफस्टॅडविरुद्ध विजय मिळवला होता. पॅरिस ऑलिम्पिक 2024 मधील पहिल्याच सामन्यात लोव्हलिनानं दमदार कामगिरी केली होती. तिनं नॉर्वेच्या सुनिव्हा हॉफस्टॅडवर 16 फेरीचा सामना जिंकून उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. 31 जुलै रोजी झालेल्या सामन्यात हॉफस्टॅडकडे लोव्हलिनाच्या दमदार पंचांना उत्तर नव्हते आणि अखेरीस भारतीय बॉक्सरने हा सामना 5-0 असा जिंकला.
लव्हलिनानं टोकियो गेम्समध्ये कांस्यपदक जिंकले होते आणि त्यामुळे पॅरिसमध्ये तिच्याकडून मोठ्या अपेक्षा होत्या. विशेष म्हणजे तिनं टोकियो ऑलिम्पिकमध्ये 69 किलो वजनी गटात पदक जिंकले आणि पॅरिस गेम्समध्ये तिच्या श्रेणीत बदल केला. टोकियोमध्ये उपांत्य फेरीच्या सामन्यात लोव्हलिनाला तुर्कीची बॉक्सर बुसेनाझ सुरमेनेलीकडून पराभव पत्करावा लागला होता. सुरमेनेलीनेच तिला पराभूत करुन शेवटी सुवर्णपदक जिंकले.
मेरी कोम आणि विजेंदर सिंग यांच्यासह टोकियो ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकणारी लोव्हलिना तिसरी भारतीय बॉक्सर ठरली होती. 2008 मध्ये विजेंदर ऑलिम्पिक पदक (कांस्य) जिंकणारा पहिला भारतीय बॉक्सर बनला होता. मेरी कोमने 2012 लंडन गेम्समध्ये महिलांच्या फ्लायवेट स्पर्धेत कांस्यपदक जिंकले होते. अशा स्थितीत ऑलिम्पिक इतिहासात एकापेक्षा जास्त पदके जिंकणारी पहिली भारतीय बॉक्सर बनण्याची संधी लोव्हलिनाला होती, पण ती मिळवू शकली नाही.
महत्त्वाच्या बातम्या-
सेमीफायनलमध्ये लक्ष्य सेन पराभूत, आता कांस्य पदकासाठी झुंज देणार
रेड कार्ड, मैदानावर 10 खेळाडू; तरीही हार मानली नाही! ‘ग्रेट वॉल’ श्रीजेशचा पेनॉल्टी शूटआऊटमध्ये पराक्रम
इतिहास घडला! भारतीय हॉकी संघाची सेमीफायनलमध्ये एंट्री, पेनल्टी शूटआऊटमध्ये मिळवला शानदार विजय