खेळाचा सर्वात मोठा महाकुंभ अर्थात ऑलिम्पिकची भव्य सुरुवात आजपासून (26 जुलै) होत आहे. पॅरिस 2024 ऑलिम्पिकचा उद्घाटन सोहळा सीन नदीच्या काठावर होणार आहे. ऑलिम्पिकसाठी भारतानं 117 खेळाडूंचा संघ पाठवला आहे. यापैकी 40 खेळाडू पहिल्यांदाच ऑलिम्पिकमध्ये सहभागी होत आहेत.
या उद्घाटन सोहळ्याची खास बाब म्हणजे, ऑलिम्पिकच्या इतिहासात पहिल्यांदाच उद्घाटन सोहळा स्टेडियममध्ये होणार नाही. ऑलिम्पिकच्या 128 वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच या खेळांमध्ये सहभागी होणाऱ्या देशांची पारंपारिक परेड पॅरिसच्या मध्यभागी वाहणाऱ्या सीन नदीच्या काठावर होणार आहे.
या उद्घाटन समारंभात 10,000 हून अधिक ऑलिम्पिक खेळाडू सुमारे 100 बोटीतून सीन नदी पार करतील. ते पॅरिसच्या नोट्रे डेम, पाँट डेस आर्ट्स, पाँट न्यूफसह काही प्रतिष्ठित स्थळांजवळून जातील. फ्लोटिंग परेड ऑस्टरलिट्झ ब्रिजपासून जार्डिन डेस प्लांटेसच्या पुढे सुरू होईल आणि ट्रोकाडेरो येथे समाप्त होईल, जिथे ऑलिम्पिक समारंभचा अंतिम शो असेल. हा कार्यक्रम तीन तासांहून अधिक काळ चालणार आहे.
ऑलिम्पिकमध्ये भारतीय दलाचं नेतृत्व स्टार बॅडमिंटनपटू पीव्ही सिंधू आणि दिग्गज टेबल टेनिस खेळाडू शरथ कमल करणार आहेत. हे दोन्ही खेळाडू ऑलिम्पिक उद्घाटन समारंभात भारताचे ध्वजवाहक असतील. पीव्ही सिंधूनं दोन वेळा ऑलिम्पिक पदक जिंकलं असून शरथ कमल पाचव्यांदा ऑलिम्पिकमध्ये सहभागी होत आहे. पॅरिस ऑलिम्पिकच्या उद्घाटन समारंभात भारतीय पुरुष खेळाडू कुर्ता बंडी परिधान करतील तर महिला खेळाडू भारताच्या तिरंगा ध्वजाचं चित्र असणारी साडी परिधान करतील.
भारतानं 2020 टोकियो ऑलिम्पिकमध्ये एकूण 7 पदके जिंकली होती. ही भारताची ऑलिम्पिक खेळांच्या इतिहासातील सर्वोत्तम कामगिरी आहे. भारतानं ऑलिम्पिक स्पर्धेत आतापर्यंत एकूण 35 पदके जिंकली आहेत. यापैकी फक्त नेमबाज अभिनव बिंद्रा (2008) आणि नीरज चोप्रा (2021) यांनी वैयक्तिक सुवर्णपदकं जिंकली आहेत.
पॅरिस ऑलिम्पिकचा उद्घाटन सोहळा भारतीय वेळेनुसार रात्री 11 वाजता सुरू होईल. हा सोहळा भारतात स्पोर्ट्स18 1 एसडी आणि स्पोर्ट्स 18 1 एचडी टीव्ही चॅनेलवर प्रसारित केला जाईल. याशिवाय पॅरिस ऑलिम्पिकचं लाईव्ह स्ट्रीमिंग ‘जिओ सिनेमा’वर मोफत उपलब्ध असेल.
हेही वाचा –
गौतम गंभीरचा स्पेशल प्लॅन, टीम इंडियातही होणार केकेआर प्रमाणे प्रयोग! हा खेळाडू घेणार सुनील नारायणची जागा
पंजाब किंग्जचं नशीब बदलेल? रणजी क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारा दिग्गज बनू शकतो मुख्य प्रशिक्षक
टाॅस होताच हृदय तुटणार! पहिल्या टी20 सामन्याच्या प्लेइंग इलेव्हनमधून हे 3 खेळाडू होणार बाहेर!