पॅरिस ऑलिम्पिकमध्ये अपात्र ठरलेली भारताची स्टार कुस्तीपटू विनेश फोगटच्या प्रकरणावर शुक्रवारी (9 ऑगस्ट) क्रीडा लवादाच्या न्यायालयात (सीएएस) सुनावणी होणार होती. तिला किमान रौप्य पदक देण्यात यावं, अशी विनंती विनेशनं क्रीडा न्यायालयात केली आहे. या प्रकरणी आता मोठी अपडेट समोर आली आहे.
कोर्ट ऑफ आर्बिट्रेशन फॉर स्पोर्ट्सनं जारी केलेल्या प्रसिद्धीपत्रकानुसार, विनेशच्या अपीलबाबत अंतिम निर्णय पॅरिस ऑलिम्पिकच्या शेवटी घेतला जाईल. विनेश फायनलपूर्वी वजन जास्त भरल्यामुळे महिलांच्या 50 किलो गटातून अपात्र ठरली होती. तिचं वजन फक्त 100 ग्रॅम जास्त होतं.
विनेश ऑलिम्पिक फायनलमध्ये पोहोचणारी पहिली भारतीय महिला कुस्तीपटू आहे. तिच्याकडून संपूर्ण देशाला सुवर्ण पदकाची अपेक्षा होती. तिचा सामना अमेरिकेच्या सारा ॲन हिल्डब्रँडशी होणार होता, जिनं नंतर झालेल्या फायनलमध्ये सुवर्ण पदक जिंकलं. पॅरिस ऑलिम्पिकमधील या घटनेनंतर विनेश फोगटनं कुस्तीतून निवृत्त होण्याचा निर्णय घेतला आहे.
भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष संजय सिंह यांनी गुरुवारी विनेश फोगटला कुस्तीतून निवृत्ती न घेण्याचं आवाहन केलं. ते विनेशला प्रत्यक्ष भेटण्याबाबत बोलले आहेत. याशिवाय स्टार भालाफेकपटू नीरज चोप्रानं देखील विनेशच्या अपात्रतेवर प्रतिक्रिया दिली आहे. नीरज म्हणाला, “पॅरिस ऑलिम्पिकमध्ये विनेशनं जे काही केलं ते प्रेरणादायी आहे. युई सुसाकीला पराभूत करणं ही मोठी गोष्ट आहे. मला कुस्तीचे नियम फारसे समजत नाहीत. पण तिनं सुवर्णपदक जिंकलं असतं.”
विनेश फोगटनं पात्रता फेरीच्या पहिल्याच सामन्यात जपानच्या युई सुसाकीला पराभूत करून मोठा उलटफेर केला होता. सुसाकी जागतिक क्रमवारीत पहिल्या स्थानावर असून ती तिच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत एकही सामना हरली नव्हती. मात्र विनेशचं या ऑलिम्पिकमध्ये तिचा हा रेकॉर्ड मोडला.
हेही वाचा –
“तोही माझ्या मुलासारखाच आहे” पाकिस्तानच्या अर्शदच्या आईनं निरज चोप्राला दिला खास संदेश
सिल्वर मेडल मिळवणाऱ्या नीरज चोप्राला मोदींचा काॅल, दुखापतीबद्दल काय म्हणाले?
गोलकीपर श्रीजेशचा मोठा सन्मान! मनू भाकरसोबत मिळाली ही महत्त्वाची जबाबदारी