पॅरिस पॅरालिम्पिकमध्ये भारतानं उत्कृष्ट कामगिरी केली आहे. भारतीय खेळाडूंनी आतापर्यंत एकूण 27 पदकं जिंकली. यामध्ये 6 सुवर्ण, 9 रौप्य आणि 12 कांस्यपदकांचा समावेश आहे.
भारताच्या होकातो होतजे सेमानं शुक्रवारी (6 सप्टेंबर) पुरुषांच्या शॉटपुटमध्ये कांस्यपदक जिंकलं. नागालँडच्या या पॅराॲथलीटची कहाणी खूपच वेदनादायक आहे. मात्र तरीही हार न मानता तो आयुष्यात पुढे जात राहिला आणि आता त्यानं देशासाठी पदक जिंकून इतिहास रचला.
वास्तविक, खेळांमध्ये आपलं नशीब आजमवण्यापूर्वी होकातो भारतीय सैन्यात होता. तो वयाच्या अवघ्या 17 व्या वर्षी सैन्यात दाखल झाला होता. होकातो सैन्याच्या विशेष दलाचा भाग होता. त्याची ड्युटी लाईन ऑफ कंट्रोल (LOC) वर होती. तेथे त्यानं भूसुरुंगाच्या स्फोटात आपला पाय गमावला. परंतु होकातोनं हार मानली नाही. तो परिस्थितीशी लढत राहिला.
यानंतर होकातोनं शॉट पुटची तयारी केली. आता वयाच्या 40व्या वर्षी त्यानं पॅरालिम्पिकमध्ये भारतासाठी कांस्यपदक जिंकलं आहे. होकातोनं पुरुषांच्या शॉट पुट F57 प्रकारात चमकदार कामगिरी केली. त्याचा सर्वोत्तम थ्रो 14.65 मीटर होता. ही त्याची वैयक्तिक सर्वोत्तम कामगिरीही आहे. इराणच्या यशिन खोसरावीनं सुवर्णपदक पटकावलं. त्यानं 15.96 मीटर थ्रो केला. तर ब्राझीलच्या थियागो पॉलिनोनं रौप्यपदक जिंकलं. त्यानं 15.06 मीटर थ्रो नोंदवला.
पॅरिस पॅरालिम्पिकच्या पदकतालिकेत भारत सध्या 17 व्या स्थानावर आहे. भारतानं एकूण 27 पदके जिंकली, ज्यात 6 सुवर्ण पदकांचा समावेश आहे. पदकतालिकेत चीन अव्वल स्थानावर आहे. चीननं आतापर्यंत 83 सुवर्ण, 64 रौप्य आणि 41 कांस्य अशी एकूण 188 पदकं जिंकली. ब्रिटन 100 पदकांसह दुसऱ्या स्थानावर आहे. त्यांनी 42 सुवर्णपदकं जिंकली आहेत. अमेरिका तिसऱ्या क्रमांकावर आहे.
हेही वाचा –
ऑलिम्पिकमध्ये दुष्काळ….तर पॅरालिम्पिकमध्ये पदकांचा वर्षाव! भारताच्या ऐतिहासिक कामगिरीमागचं कारण काय?
इंग्लंडच्या कर्णधाराचं अनोखं शतक, कसोटी क्रिकेटच्या 147 वर्षांच्या इतिहासात असं प्रथमच घडलं!
ठरलं! विनेश फोगट या सीटवरून निवडणूक लढणार, काँग्रेसची पहिली यादी जाहीर