पॅरिस पॅरालिम्पिकमध्ये भारतानं आतापर्यंत एकूण 27 पदकं जिंकून खळबळ उडवली आहे. 2020 टोकियो पॅरालिम्पिकमध्ये भारतानं 19 पदकं जिंकली होती, जी भारताची सर्वोत्तम कामगिरी होती. पॅरिस पॅरालिम्पिकमधील पदकांची ही संख्या आश्चर्यकारक आहे, कारण लंडन पॅरालिम्पिकमध्ये (2012) भारताला केवळ एकच पदक मिळालं होतं. त्यानंतर रिओ 2016 मध्ये भारतानं केवळ 4 पदकं जिंकली होती.
दुसरीकडे जर आपण ऑलिम्पिकबद्दल बोललो, तर एका स्पर्धेत भारताची सर्वोत्तम कामगिरी 7 पदकांची (टोकियो 2020) आहे. पॅरालिम्पिकमध्ये मात्र भारतीय खेळाडू पदकांचा पाऊस पाडत आहेत. पॅरालिम्पिक ही शारीरिक, बौद्धिक किंवा दृष्टिदोष असलेल्या खेळाडूंसाठीची स्पर्धा असते.
पॅरालिम्पिकमधील पदकांमध्ये प्रचंड वाढ होण्याचं मुख्य कारण म्हणजे त्यात सहभागी होणाऱ्या खेळाडूंची वाढती संख्या. गेल्या काही पॅरालिम्पिकबद्दल बोलायचं झालं तर, भारताच्या 19 खेळाडूंनी रिओमध्ये भाग घेतला होता. तेव्हा देशानं 2 सुवर्ण पदकांसह 4 पदकं जिंकली होती. यानंतर टोकियो पॅरालिम्पिकमध्ये भारताचे 54 पॅरा ॲथलीट सहभागी झाले होते. यामध्ये भारतानं 5 सुवर्ण पदकांसह 19 पदकं जिंकली. आता पॅरिस पॅरालिम्पिकमधील खेळाडूंची संख्या 84 झाली आहे. 6 सप्टेंबरपर्यंत भारतानं 6 सुवर्ण पदकांसह एकूण 27 पदकं जिंकली आहेत.
आकडेवारीवरून स्पष्ट आहे की, ऑलिम्पिकच्या तुलनेत पॅरालिम्पिकमध्ये भारताला खूप जास्त पदकं मिळू लागली आहेत. जरी ऑलिम्पिकची तुलना पॅरालिम्पिकशी होऊ शकत नाही, तरी पॅरालिम्पिकमध्ये जिंकलेल्या पदकांची संख्या नक्कीच लक्ष वेधून घेते.
पॅरालिम्पिकमधील भारताच्या चांगल्या कामगिरीची मुख्य कारणं –
(1) पॅरा-स्पोर्ट्सवर अधिक लक्ष आणि गुंतवणूक – अलिकडच्या वर्षांत भारत सरकार आणि पॅरालिम्पिक समितीनं पॅरा-ॲथलीट्ससाठी ठोस पावलं उचलली आहेत. यामध्ये विशेषत: पॅरा-स्पोर्ट्ससाठी वाढीव निधी, कोचिंग आणि पायाभूत सुविधांचा समावेश आहे. सरकारकडून पॅरिस पॅरालिम्पिकसाठी 74 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली होती. तर टोकियो पॅरालिम्पिकसाठी केवळ 26 कोटी रुपयांची तरतूद होती.
(2) आंतरराष्ट्रीय स्तरावर स्पर्धा कमी – ऑलिम्पिकच्या तुलनेत पॅरालिम्पिकमध्ये सहभागी होणाऱ्या खेळाडूंची संख्या कमी असते. यामुळे भारतीय खेळाडूंना पात्रता मिळवणं आणि पदक जिंकणं तुलनेनं सोपे होतं. SAI आणि क्रीडा मंत्रालयाच्या हस्तक्षेपानंतर पॅरालिम्पिकमधील भारतीय खेळाडूंचा सहभाग वाढला आहे.
(3) खेळांचं वर्गीकरण – पॅरालिम्पिकमध्ये खेळाचं वर्गीकरणं केलं जातं. याचा उद्देश समान पातळीच्या खेळाडूंची एकमेकांशी स्पर्धा व्हावी, हा असतो. याचा फायदा विविध प्रकारच्या शारीरिक समस्या असलेल्या भारतीय खेळाडूंना होऊ लागला आहे. याशिवाय पॅरालिम्पिकमध्ये खेळाडूंच्या शारिरिक व्याधीनुसार एकाच खेळात वेगवेगळे इव्हेंट असतात. यामुळे खेळाडूंची पदक जिंकण्याची शक्यता वाढते.
(4) खेळाला तंत्रज्ञानाची जोड – भारताच्या पॅरालिम्पिक कार्यक्रमाला तंत्रज्ञानाची जोड मिळाल्यानं मोठा फायदा झाला आहे. यामुळे पॅरा-ॲथलीट्सना त्यांची क्षमता वाढवण्यास मदत झाली. NADA (नॅशनल अँटी-डोपिंग एजन्सी) चे नियम हिंदीमध्ये भाषांतरित केले गेले, जेणेकरून खेळाडूंना कोणत्या गोष्टींवर बंदी आहे हे समजेल. आता पॅरा खेळाडू स्वत:ला आंतरराष्ट्रीय दर्जाच्या आधारे तयार करत आहेत.
हेही वाचा –
उंच उडीत प्रवीणची सुवर्ण कामगिरी! भारतानं जिंकलं सहावं गोल्ड मेडल
ठरलं! विनेश फोगट या सीटवरून निवडणूक लढणार, काँग्रेसची पहिली यादी जाहीर
भारतीय कसोटी संघात पुनरागमन करण्यासाठी पंत सज्ज, दुलीप ट्रॉफीत यष्टीमागे दाखवली चपळता