आयपीएल २०२२ सुरू होण्याच्या दोन दिवस आधी एमएस धोनीने त्याची फ्रेंचायझी चेन्नई सुपर किंग्जचे कर्णधारपद सोडले. परंतु नवा कर्णधार रवींद्र जडेजाच्या नेतृत्वातील सीएसकेसाठी या आयपीएल हंगामाची सुरुवात निराशाजनक झाली. सीएसकेने त्यांचे पहिले दोन्ही सामने गमावले. गुरुवारी (३१ मार्च) सीएसकेला लखनऊ सुपर जायंट्सने ६ विकेट्सने पराभूत केले. या सामन्यात सीएसकेच्या नेतृत्वाची जबाबदारी जडेजाच्या खांद्यावर असली, तरी मैदानात धोनी खेळाडूंना सुचना करताना दिसला. याच पार्श्वभूमीवर सीएसकेचा माजी खेळाडू पार्थिव पटेलने धोनीवर निशाणा साधला आहे.
लखनऊविरुद्धच्या या सामन्यात सीएसकेने मोठी धावसंख्या उभारली होती, पण प्रत्युत्तरात लखनऊच्या फलंदाजांनी धमाकेदार प्रदर्शन केले आणि विजय मिळवला. एविन लुईस आणि आयुष बदोनी या दोघांचे विजयातील योगदान बहुमूल्य होते. सामन्यात एमएस धोनी (MS Dhoni) सीएसकेच्या खेळाडूंना निर्देश देताना दिसत होता. मात्र, कर्णधार रवींद्र जडेजा (Ravindra Jadeja) एका बाजूला क्षेत्ररक्षकाची भूमिका बजावत होता. याच पार्श्वभूमीवीर माजी यष्टीरक्षक फलंदाज पार्थिव पटेल व्यक्त झाला आहे.
सामना संपल्यानंतर पार्थिव पेटल (Parthiv Patel) म्हणाला की, “जर तुम्हाला एखाद्याला विकसित करायचे असेल, तर तुम्हाला त्याला मैदानात मोकळीक द्यावी लागेल. नावापुढे कर्णधार जोडल्यामुळे कोणी कर्णधार बनत नाही. जडेजा चुका करेल, पण त्यातून शिकेल सुद्धा. मला वाटते, जर तुम्हाला जडेजाला एका खेळाडू आणि कर्णधाराच्या रूपात विकसित करायचे आहे, तर तुम्ही त्याला निर्णय घेऊ दिले पाहिजेत. ज्या पद्धतीने सामन्यात कॅमेरा दाखवत होता, असे वाटत होते की, धोनी खेळ नियंत्रित करत आहे.”
सीएसके आणि लखनऊ (CSK vs LSG) यांच्यातील या सामन्याचा विचार केला, तर लखनऊला शेवटच्या २ षटकांमध्ये विजयासाठी ३४ धावांची आवश्यकता होती. परंतु सीएसकेच्या शिवम दुबेने १९ व्या षटकात तब्बल २५ धावा खर्च केल्या आणि लखनऊ विजयाच्या जवळ गेला. शेवटच्या ६ चेंडूत लखनऊला ९ धावांची गरज होती आणि त्यांना हे लक्ष्य तीन चेंडू शिल्लक ठेऊन गाठले.
दरम्यान, लखनऊने सुरुवातीला नाणेफेक जिंकली आणि प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना सीएसकने ७ विकेट्सच्या नुकसानावर२१० धावा केल्या. प्रत्युत्तरात लखनऊने हे लक्ष्य १९.३ षटकात आणि ४ विकेट्सच्या नुकसानावर गाठले.
महत्वाच्या बातम्या –
रसलच्या तुफानी खेळीचं किंगखानकडून कौतुक! म्हणाला, ‘चेंडू एवढा उंच उडताना…’
अभिमानास्पद! विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात भारताची जीएस लक्ष्मीवर मोठी जबाबदारी, वाचा सविस्तर
काय सांगता! राशिद खान स्वत:ला मानत नाही लेग स्पिनर, कारणही केलंय स्पष्ट