भारतीय क्रिकेट खेळाडू पार्थिव पटेलने काल प्रो कबडीमधील सामन्यांना हजेरी लावली होती. घरेलू संघ गुजरात फॉरचून जायन्टस संघाला पाठींबा देण्यासाठी पार्थिव मैदानात आला होता. काल गुजरात विरुद्ध जयपूर पिंक पँथर्स सामना झाला होता. या सामन्यात गुजरात संघाने विजय मिळवला होता.
या सामन्यानंतर झालेल्या मुलाखतीत विचारलेल्या प्रश्नांना त्याने दिलखुलासपणे उत्तरे दिले. आपण लहानपणी कबड्डी खेळायचो. संघात रेडर म्हणून खेळायला आवडायचे असेही त्याने सांगितले.
प्रो कबड्डीच्या अधिकृत फेसबुक खात्यावरून पार्थिवचा एक खास विडिओ शेअर करण्यात आला आहे. त्यात तो म्हणाला,”कबड्डीने गुजरातमध्ये लोकांना वेडे केले आहे. आम्ही प्रो कबड्डीमधील सर्व संघाच्या पाठीशी आहोत.”
पार्थिव पटेल घरेलू क्रिकेट गुजरात संघाकडून खेळतो. तो गुजरात संघाचा कर्णधार आहे. मागील २०१६-१७ रणजी मोसमाच्या अंतिम सामन्यात मुंबईला हरवून गुजरातचा पहिल्यांदा विजेता ठरला होता. अंतिम सामन्यात खेळताना पार्थिवने पहिल्या डावात ९० धावा केल्या होत्या तर त्याने दुसऱ्या डावात धावांचा पाठलाग करताना १४३ धावांची खेळी उभारली होती.
पार्थिव पटेलने २००२ साली इंग्लंड विरुद्ध खेळताना विकेटकीपर बॅट्समन म्हणून भारतीय कसोटी संघात पदार्पण केले. त्यावेळी त्याचे वय होते अवघे १७ वर्षे १५३ दिवस. विकेटकीपर बॅट्समन म्हणून कसोटी पदार्पण करणारा तो सर्वात कमी वयाचा खेळाडू ठरला होता. २००३ साली न्युझीलँड विरुद्ध पार्थिवने एकदिवसीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते.