संयुक्त अरब अमिराती (युएई) आणि ओमान येथे आयसीसी टी२० विश्वचषक २०२१ चा थरार सुरू आहे. सध्या टी२० विश्वचषकातील पात्रता फेरी सामने खेळले जात आहेत. यातील ४ संघ सुपर १२ फेरीत धडक मारतील. आधीपासूनच सुपर १२ मध्ये जागा मिळवलेल्या भारतीय संघाचा पहिला सामना २४ ऑक्टोबर रोजी पारंपारिक प्रतिद्वंद्वी पाकिस्तान यांच्याविरुद्ध होणार आहे. या सामन्यापूर्वी भारताचा माजी यष्टीरक्षक फलंदाज पार्थिव पटेल याने भारतीय संघाची सर्वोत्कृष्ट प्लेइंग इलेव्हन निवडली आहे.
पार्थिवने टी२० विश्वचषकासाठीच्या सर्वोत्तम संघात रोहित शर्मा आणि केएल राहुल यांना सलामी जोडीच्या रुपात निवडले आहे. राहुलने नुकत्याच युएईत झालेल्या आयपीएल २०२१ मध्ये फलंदाजीत शानदार प्रदर्शन केले होते. याच धर्तीवर पार्थिवने त्याला प्लेइंग इलेव्हनमध्ये जागा दिली आहे. सलामी फलंदाजांनंतर तिसऱ्या क्रमांकावर त्याने कर्णधार विराट कोहलीला निवडले आहे. वरच्या फळीनंतर मधल्या फळीत त्याने सूर्यकुमार यादव, रिषभ पंत आणि अष्टपैलू हार्दिक पंड्याला अनुक्रमे चौथ्या, पाचव्या आणि सहाव्या क्रमांकावर ठेवले आहे.
याबरोबरच फिरकी अष्टपैलूच्या रुपात त्याने रविंद्र जडेजाला आपल्या संघात सामील केले आहे. मात्र हा माजी यष्टीरक्षक फलंदाज वेगवान गोलंदाजी विभागात शार्दुल ठाकूर आणि भुवनेश्वर कुमार यांच्या निवडीवरुन दुविधेत अडकल्याचे दिसले आहे. त्यामुळे त्याने या दोघांनाही आपल्या संघात स्थान दिले आहे. त्यांच्याखेरीज जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद शमी यांनाही सहभागी केले आहे. तर फिरकी गोलंदाजी विभागात आयपीएल २०२१ मध्ये फ्लॉप ठरलेल्या राहुल चाहरला निवडले आहे.
टी२० विश्वचषकासाठी पार्थिव पटेलने निवडलेली भारताची सर्वोत्कृष्ट प्लेइंग इलेव्हन: केएल राहुल, रोहित शर्मा, विराट कोहली (कर्णधार), सूर्यकुमार यादव, रिषभ पंत, हार्दिक पांड्या, रविंद्र जडेजा, शार्दुल ठाकुर/ भुवनेश्वर कुमार, मोहम्मद शमी, राहुल चाहर, जसप्रीत बुमराह.
महत्त्वाच्या बातम्या-
बाबर आजमने झळकावलं अर्धशतक, सराव सामन्यात पाकिस्तानचा वेस्टइंडीजवर दणदणीत विजय