भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातल्या पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतील तिसरा सामना शनिवारपासून ब्रिस्बेन येथे खेळला जाणार आहे. पहिल्या दोन सामन्यांमध्ये चाहत्यांना दोन्ही संघांमध्ये चुरशीची स्पर्धा पाहायला मिळाली. या मालिकेत आतापर्यंत वेगवान गोलंदाजांचं वर्चस्व राहिलं असून गाबा येथे होणाऱ्या सामन्यात बुमराह, कमिन्स आणि स्टार्कसारखे वेगवान गोलंदाज आपापल्या संघासाठी महत्त्वाची भूमिका बजावू शकतात. तिसऱ्या सामन्यापूर्वी ऑस्ट्रेलियन कर्णधार पॅट कमिन्सनं गाबाच्या खेळपट्टीबाबत मोठा इशारा दिला आहे.
ब्रिस्बेनमध्येही भारतीय फलंदाजांच्या अडचणी कमी होणार नसल्याचं पॅट कमिन्सनं पत्रकार परिषदेत सांगितलं. गेल्या दोन सामन्यांमध्ये ऑस्ट्रेलियन गोलंदाजांनी बाऊन्सरनं भारतीय फलंदाजांना चांगलंच अडचणीत आणलं होतं. ऑस्ट्रेलिया गाब्बामध्येही हीच रणनीती वापरणार आहे. ॲडलेडमधील गुलाबी चेंडू कसोटीच्या दोन्ही डावात ऑस्ट्रेलियन वेगवान गोलंदाजांनी विशेषतः कमिन्सनं भारतीय फलंदाजांना खूप त्रास दिला होता. ऑस्ट्रेलियानं ही कसोटी दहा गडी राखून जिंकली आणि मालिकेत 1-1 अशी बरोबरी साधली.
पॅट कमिन्स म्हणाला, “ॲडलेड कसोटीत आम्हाला ही रणनिती (बाऊन्सर) कामी आली. ती प्लॅन बी म्हणून आमच्या मनात आहे. जर यामुळे ते अस्वस्थ होत असतील तर आम्ही त्याला प्लॅन ए बनवू शकतो. ॲडलेडमध्ये ती प्रभावी होती. त्यामुळे या कसोटीत आम्ही तसाच प्रयत्न करू असा मला विश्वास आहे.”
अनुभवी स्टीव्ह स्मिथनं आतापर्यंत या मालिकेत चांगली कामगिरी केलेली नाही. परंतु कमिन्सला विश्वास आहे की तो लवकरच फॉर्ममध्ये येईल. कमिन्स म्हणाला, “तो (स्मिथ) नेट्समध्ये चांगली फलंदाजी करत आहे. तो चांगली कामगिरी करेल याची मला खात्री आहे. तो खूप अनुभवी आहे आणि त्याची चांगली खेळी फार दूर नाही.”
हेही वाचा –
अजिंक्य रहाणेच्या झंझावातात हार्दिक पांड्याचा संघ उडाला! मुंबईची फायनलमध्ये धडक
विराट कोहली गाबामध्ये पूर्ण करणार ‘अनोखं शतक’, सचिननंतर अशी कामगिरी करणारा केवळ दुसरा खेळाडू!
IND vs AUS: गाबा कसोटीत भारत दुहेरी संकटात, खेळपट्टीनंतर आता हवामानाबाबत मोठे अपडेट समोर






