शुक्रवारी (5 एप्रिल) आयपीएल 2024 च्या 18व्या सामन्यात सनरायझर्स हैदराबाद आणि चेन्नई सुपर किंग्ज आमनेसामने होते. हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर हा सामना खेळला गेला. या सामन्यात हैदराबादनं चेन्नईवर 6 गडी राखून सहज विजय मिळवला.
जरी हा सामना सनरायझर्स हैदराबादच्या घरच्या मैदानावर होता, तरी स्टेडियम मात्र चेन्नईच्या चाहत्यांनी खचाखच भरलं होतं. हे सर्व चाहते महेंद्रसिंह धोनीला खेळताना पाहण्यासाठी आले होते. चेन्नईच्या डावाच्या 20 व्या षटकात धोनी फलंदाजीला आला, तेव्हा तर चाहत्यांनी अख्ख स्टेडियम डोक्यावर घेतलं होतं. चाहत्यांमध्ये धोनीची ही क्रेझ पाहून सनरायझर्स हैदराबादचा कर्णधार पॅट कमिन्सही थक्क झाला होता.
कमिन्सनं सामन्यानंतर सादरीकरणाच्या कार्यक्रमात सांगितलं की, “आज रात्री चाहते वेडे झाले होते. जेव्हा एमएस धोनी बॅटिंगसाठी बाहेर आला तेव्हा जेवढा आवाज झाला तेवढा आवाज मी आतापर्यंत कधीच ऐकला नव्हता.” असं असलं तरी धोनीला या सामन्यात फारसं काही करता आलं नाही. त्यानं दोन चेंडूंत केवळ एक धाव घेतली. मात्र त्याची फलंदाजी पाहण्यासाठी आलेल्या चाहत्यांसाठी एवढाच क्षण खूप आनंदाचा होता.
पॅट कमिन्सनं चेन्नईविरुद्ध शानदार गोलंदाजी केली. त्यानं 24 चेंडूत 45 धावा करणाऱ्या शिवम दुबेची मौल्यवान विकेट घेतली. ही त्याची आयपीएलमधील 50वी विकेट होती. पॅट कमिन्सनं हैदराबादचा युवा सलामीवीर अभिषेक शर्माच्या स्फोटक खेळीचंही कौतुक केलं. अभिषेक शर्मानं 12 चेंडूत 3 चौकार आणि 4 षटकारांच्या मदतीनं 37 धावा ठोकल्या. पॅट कमिन्स म्हणाला की, तो अभिषेक कडून कधीही गोलंदाजी करून घेणार नाही.
सामन्याबद्दल बोलायचं झालं तर, नाणेफेक हरल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना चेन्नई सुपर किंग्जनं 20 षटकांत 4 गडी गमावून 165 धावा केल्या. प्रत्युत्तरात, सनरायझर्स हैदराबादनं 18.1 षटकांत 4 गडी गमावून लक्ष्य गाठलं. हैदराबाद कडून एडन मार्करमनं 36 चेंडूत सर्वाधिक 50 धावा केल्या.
महत्त्वाच्या बातम्या-
‘थाला’ला पाहण्यासाठी काहीही! हैदराबादमध्ये चाहत्यांनी तोडले स्टेडियमचे बॅरिकेड्स, पोलिसांकडून कारवाई
ऑरेंज कॅपच्या शर्यतीत अभिषेक शर्माची एंट्री, पर्पल कॅपवर मोहित शर्माचा ताबा
IPL 2024 मध्ये सर्वाधिक षटकार मारणारे फलंदाज कोणते? टॉप-५ मध्ये दोन अनकॅप्ड भारतीय