प्रतिष्ठेच्या मानल्या जाणाऱ्या ऍशेस कसोटी मालिकेतील तिसरा सामना गुरुवारी (6 जुलै) हेडिंग्ल येथे सुरू होईल. मालिकेतील पहिले दोन सामने गमावलेला यजमान इंग्लंड संघ या सामन्यातून पुनरागमन करण्याचा प्रयत्न करेल. दुसरीकडे ऑस्ट्रेलिया हा सामना जिंकून मालिका आपल्या नावे करण्याच्या प्रयत्नात असणार आहे. असे असताना सामन्यापूर्वी झालेल्या पत्रकार परिषदेत ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पॅट कमिन्स याने अत्यंत महत्त्वपूर्ण विधान केले आहे.
लॉर्ड्स मैदानावर झालेल्या मालिकेतील दुसऱ्या कसोटीच्या अखेरच्या दिवशी मोठा वाद पाहायला मिळाला. जॉनी बेअरस्टो याला धावबाद करताना ऑस्ट्रेलिया संघाने खिलाडूवृत्ती दाखवली नाही, असा आरोप लावला गेला. त्यानंतर माजी खेळाडू, चाहते तसेच उभय देशांचे पंतप्रधान देखील या प्रकरणावर व्यक्त होताना दिसले. याच बाबतीतील प्रश्न तिसऱ्या कसोटी आधीच्या पत्रकार परिषदेत कमिन्सला विचारला गेला.
तुम्ही दुसऱ्या कसोटीत बेअरस्टोला ज्याप्रकारे बाद केले, तशा प्रकारची संधी पुन्हा एकदा मिळाल्यास तुम्ही खेळाडूला बाद करणार का? असा प्रश्न त्याला विचारण्यात आलेला. त्यावर त्याने केवळ एका शब्दात हो असे उत्तर दिले. त्यामुळे आता या तिसऱ्या सामन्यात पुन्हा एकदा मोठा संघर्ष पाहायला मिळण्याची शक्यता आहे.
लॉर्ड्स कसोटीच्या पाचव्या दिवशीच्या पहिल्या सत्रात कॅमेरून ग्रीन गोलंदाजी करत असताना फलंदाजी करत असलेल्या जॉनी बेअरस्टो याने तो चेंडू सोडला आणि पुढे चालू लागला. मात्र, ऑस्ट्रेलियाचा यष्टीरक्षक ऍलेक्स केरी याने चेंडू हातात आल्यानंतर थेट यष्ट्यांवर फेकला. ऑस्ट्रेलियन खेळाडूंनी जोरदार अपील केले. मैदानावरील पंचांनी तिसऱ्या पंचांकडे दाद मागितल्यानंतर त्यांनी बेअरस्टोला बाद घोषित केले. यामध्ये अनेकांनी ऑस्ट्रेलिया संघाने खिलाडूवृत्ती दाखवत त्याला पुन्हा फलंदाजीला बोलवायला हवे होते असे म्हटले. तर, काहींनी बेजबाबदारपणे क्रिझ बाहेर आलेल्या बेअरस्टोला दोषी घोषित केले.
(Pat Cummins Said If Get Chance We Will Always Succeed Runout Like Bairstow)
महत्वाच्या बातम्या –
सराव सामन्यात मुंबईकरांची सॉलिड ओपनिंग! विराट फ्लॉप, पुन्हा केली तीच चूक
‘या’ कारणाने रिंकू सिंगला नाही मिळाली टीम इंडियात जागा, थोडक्यात हुकली संधी